आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात 1500 काेटी रुपये उपलब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून महिनाभरात जिल्ह्याला जवळपास १५०० कोटी उपलब्ध झाले. त्यापैकी अद्याप ४०० कोटी रुपये वितरणासाठी शिल्लक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, बँकांमध्ये चार हजारांहून अधिक रक्कम दिली जात नसून, एसबीआय वगळता अन्य बँकांचे एटीएम बंदच आहेत. दरम्यान, बुधवारी चार बँकांना आरबीआयने रोकड घेण्यासाठी बोलाविल्याने आता जिल्ह्यास वाढीव रोकड उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.

नाेटाबंदीनंतर दोन-तीन दिवसांत २००० रुपयांच्या नोटा चलनात दाखल झाल्या. परंतु, त्या एटीएममध्ये येण्यास बराच कालावधी गेला. त्यानंतर ५०० च्या नव्या नोटाही चलनात आल्या. पण, जिल्ह्याच्या वाट्याला या नोटा अगदीच कमी आल्याने त्या व्यवहारातही फार दिसत नाहीत. एसबीआयच्या एटीएममध्येही २००० रुपयांच्याच नोटा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय आणि नव्या पाचशेच्या नोटांची २५० कोटींची मागणी असतानाही त्या मिळतच नसल्याने आता ऐन पगाराच्या दिवसांतच बँका आणि प्रशासनापुढे मोठे संकट उभे राहिले आहे.

केवळ एसबीआयच्याच बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड, एटीएममध्ये २००० हजार रुपयांच्या नोटा तर, १०० रुपयांच्या नोटाही काही प्रमाणात उपलब्ध होत आहेत. इतर बँकांमध्ये महिना उलटल्यानंतरही रोकडची उपलब्धतेची स्थिती फार चांगली नाही. बँका ४००० रुपयांहून अधिक रक्कम देतच नाहीत. तर, दुपारी १२ वाजेनंतर रोकडही संपल्याचे फलक बहुतांशी बँकेत लागतात. त्यामुळे इतर बँकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्याचा सर्व त्रास ग्राहकांनाच सोसाव लागत असल्याचे चित्र बुधवारी संपूर्ण शहरात दिसून येत होते.
या बँकांना मिळणार रोकड
यूबीएफ,बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज, देना या चार बँकांना आरबीआयने रोकड घेण्यासाठी बोलावले असल्याचे समजते. यामुळे जिल्ह्यातील चलनकोंडी कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एटीएमची समस्या कायम
जिल्ह्यात ९०६ एटीएम असून, त्यातील केवळ एसबीआयचेच एटीएम सुरू आहेत. जवळपास ८० टक्के एटीएममध्ये रोकड नसल्याने ते बंदच आहेत.
बातम्या आणखी आहेत...