आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बीसीपी’चा आधार घेतल्यासच नाशिकचे उत्कृष्ट प्रमोशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आयटी हा 24 बाय 7 बाय 365 चालणारा उद्योग असतो. त्याच्या विस्तारासाठी नाशिकमधील अशा परिसंवादाबरोबरच बाहेरील राज्यांमध्ये ‘बीसीपी’ (बिझनेस कॉन्फरन्सिंग प्लॅनिंग) करणे आवश्यक आहे. बाहेरील राज्यांमध्ये असलेल्या उद्योगांना नाशकात येण्याबाबत प्रयत्न केले गेले तरच त्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन नॅसकॉमचे वरिष्ठ व्यवस्थापक परेश दिघावकर यांनी नमूद केले.

आयटी नेक्स्ट डेस्टिनेशन परिसंवादासाठी नाशिकमध्ये आले असताना, त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. जे आयटी उद्योग महाराष्ट्रात आहेत, त्यांच्याबरोबरच जे आयटी उद्योग अद्याप महाराष्ट्रात नाहीत, त्यांना नाशिकला आमंत्रित करण्यावर भर द्यायला हवा. या उद्योगात एक क्षणही काम थांबू नये, इतके प्रेशर असते. अशा स्थितीत ‘महाराष्ट्र बंद’ किंवा कोणतेही एखादे महानगर बंद अशा वेळी त्या कंपनीचे काम थांबविणे शक्य नसते. म्हणून मग ते काम अन्य राज्यांमध्ये होणे अत्यावश्यक असते. त्यामुळे आयटी कंपन्यांना एकाच राज्यात अनेक शाखा काढण्यापेक्षा वेगवेगळ्या राज्यात उद्योग असणे त्यांना सोयीस्कर असते. त्यामुळेच निमा किंवा तत्सम नाशिकच्या समित्या, नाशिकमधील संबंधित वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि नॅसकॉमसारख्या संघटनांचे सहकार्य घेऊन एक -दोन वर्षे सातत्याने ‘बीसीपी’ घेतल्यास त्याचा परिणाम नक्कीच काही कंपन्या नाशकात येण्यातून दिसू शकतो, असेही दिघावकर यांनी नमूद केले.

नाशिकची स्पर्धा नागपूरशी

आयटीच्या बाबतीत नाशिकची तुलना पुण्याशी नव्हे, तर नागपूरशी करावी लागेल. नागपूरला जमिनीची उपलब्धता व देशात मध्यवर्ती स्थान असल्याचा फायदा, आयटी विकासासाठी स्थानिकांचे प्रयत्न पाहता नागपूरदेखील आयटीमध्ये वेगाने आगेकूच करताना दिसत आहे. नागपूरच्या स्पर्धेत नाशिकची आयटी वाढ करायची असेल तर नाशिकमधील धुरिणांना अधिक वेगाने प्रयत्न करावे लागतील.

नाशिकला घाई करावीच लागेल

इन्फोसिसने नागपूरमध्ये 125 एकर जमीन खरेदी केली. त्यामुळे नाशिकला नेक्स्ट आयटी डेस्टिनेशन बनायचे असेल तर वेगाने पावले उचलावी लागतील; अन्यथा नाशिकमध्ये येऊ शकणारे आयटी उद्योग नागपूरकडे वळू शकतात. नाशिकमधील धुरिणांना त्वरेने पावले उचलावीच लागतील, असा पुनरुच्चार दिघावकर यांनी केला.


‘बीपीएम’ला प्राधान्य द्या

एक मोठी आयटी कंपनी नाशकात आणण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न झाले व त्यांना आवश्यक सुविधा दिल्यास नाशिकच्या आयटी क्षेत्राचे चित्रच बदलू शकते. मात्र, तोपर्यंत नाशकात अधिकाधिक बीपीएम (बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट) सुरू करणे आवश्यक आहे. यापूर्वी बीपीओ (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) व केपीओ (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग) हेच केले जात होते. त्याचबरोबर आता ‘बीपीएम’ ही संकल्पना रुळू लागली असून, त्याला प्राधान्य दिल्यास एक पाऊल पुढे पडू शकेल. त्यासाठी कुशल मनुष्यबळ नाशकात मुबलक उपलब्ध असल्याचेही दिघावकर म्हणाले.