आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावधान ग्राहक: मिठाईला विषकणांचा डंख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिठाई आकर्षक दिसावी म्हणून दोन दशकांहून अधिक काळापासून चांदीचा वर्ख मिठायांवर लावण्यास प्रारंभ झाला. विशेषत: उत्तर भारतातील काही मिठायांवर हा चांदीचा वर्ख प्रारंभी लावला जाऊ लागला. चांदी स्वस्त असण्याच्या काळात काही विशिष्ट बर्फीवर वर्ख लावण्याची प्रथा रुढ झाली. त्याकडे बालके आकर्षित होण्याचे मोठे प्रमाण लक्षात घेऊन हळूहळू तो वर्ख सर्वच मिठायांवर लावला जाऊ लागला. मात्र, जेव्हापासून चांदीने पंचवीस हजारांचा टप्पा ओलांडला तेव्हापासून अनेक हलवायांकडील चांदीच्या वर्खाच्या जागी अँल्युमिनिअमचा वर्ख शिरकाव करू लागला. हळूहळू मिठाईवर अँल्युमिनियमचा वर्ख लावणे हीच जणू प्रथा बनली. त्याबाबत मिठाई विक्रेते तसेच, अन्न-औषध विभाग आणि आरोग्य विभागाकडूनही ‘अळीमिळी गुपचिळी’चे धोरण कायम असल्याने नागरिकांना आरोग्याला घातक ठरणारी मिठाई खावी लागते आहे.

बालके होतात आकर्षित
ज्या मिठाईला वर्ख असतो, त्या मिठाईकडे बालके आकर्षित होतात. त्यामुळे मिठाईवाल्यांच्या दुकानात मुलांसमवेत गेलेल्या पालकांकडे वर्ख असलेली मिठाई घेण्याचाच आग्रह मुलांकडून होत असतो. त्यात पालकांनादेखील वर्ख हा किती घातक असतो, ते माहीत नसल्याने मुलांच्या आग्रहाला बळी पडून वर्ख लावलेली मिठाईच खरेदी केली जाते. अर्थात केवळ अज्ञानामुळे पालकच अँल्युमिनिअमसारखा घातक घटक बालकांच्या तोंडी घालत आहेत.

परिणाम त्वरित दिसत नसल्याचा फटका
अँल्युमिनिअमच्या वर्खाची मिठाई खाल्लय़ानंतर त्याचा दुष्परिणाम तत्काळ दिसत नाहीत. मात्र, हा वर्ख थोड्या अधिक प्रमाणात पोटात गेल्यास अँसिडीटीचा त्रास जाणवण्यास सुरुवात होते. दुर्दैवाने, ती जळजळ या वर्खामुळे झाल्याचे अनेकांना लक्षातही येत नाही. परिणामी काही वर्षांपासून हा उद्योग बिनबोभाट सुरू आहे.


असा तयार होतो अँल्युमिनिअम वर्ख
अँल्युमिनिअम धातूपासून सर्वप्रथम एक पत्रा तयार केला जातो. त्या पत्र्याची गुंडाळी करून तो भट्टीत सुमारे 250 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवून त्याला तप्त बनविले जाते. काहीसा थंड झाल्यावर एका मोठय़ा मशीनमध्ये उभ्या दिशेने दाब देतानाच आडव्या दिशेने ताणले जाते. ही एकप्रकारची लाटण क्रिया प्रचंड वजनाच्या पोलादापासून केली जाते. त्यांचा पृष्ठभाग सपाट, गुळगुळीत आणि चकचकीत असल्याने चमकदार वर्ख तयार होतो.

फरक आणि साम्य
अस्सल चांदीचा वर्ख बोटावर चोळला तर बोटांवर एकजीव होऊन जातो. तसेच जिभेवर ठेवला तर काही क्षणात विरघळतो. तर अँल्युमिनिअम वर्ख बोटांना पेपरसारखा लागतो. तो वर्ख जिभेवर चिकटतो, त्याला गिळावे लागते. मात्र, अँल्युमिनिअम वर्ख व चांदीच्या वर्खाला कोणतीही चव, गंध नसल्याने त्यांतील तफावत सर्वसामान्यांना सहजासहजी ओळखता येत नाही.


आगामी सणासुदीत राहणार मोठे आव्हान
श्रावणापाठोपाठ लगेचच गणेशोत्सव व नंतर नवरात्रोत्सवापासून सणासुदीची चाहूल लागते. दिवाळीपर्यंत हा उत्साह कायम असतो व तो मिठाईशिवाय अपूर्णच मानला जातो. या दिवसांत सर्वाधिक मिठाईची खरेदी होत असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनालादेखील मिठाई विक्रेत्यांवर विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे.


थेट प्रश्न
अँल्युमिनिअम वर्ख लावण्यांवर कठोर कारवाई
चंद्रकांत पवार, अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त
0 मिठाई विक्रेत्यांकडून मिठाईवर चांदीच्या नावाने अँल्युमिनिअमचा वर्ख लावला जातो, याबाबत काही माहिती आहे का?
हो, जेव्हापासून चांदी महागली, तेव्हापासून काही मिठाई विक्रेत्यांकडून चांदीऐवजी अँल्युमिनिअम वर्खाचा वापर केला जातो.
0यंदाच्या वर्षात आपण किती मिठाई वर्खांचे नमुने घेतले?
यंदाच्या वर्षभरात तर तसे काही नमुने घेतलेले नाहीत. मात्र, त्यातील खव्यावर आपले अत्यंत बारीक लक्ष असून विक्रेत्यांवर त्यासंदर्भात कारवाईदेखील करण्यात आली आहे.
0 अँल्युमिनिअम वर्ख लावणार्‍यांवर काही कारवाई केली आहे का?
नाही, अशा प्रकारची कारवाई यंदा केलेली नाही. मात्र, मागील वर्षाची काही माहिती उपलब्ध आहे.
0 अँल्युमिनिअम वर्ख लावणार्‍यांवर काय कारवाई करणार?
मिठाईचे नमुने आजच गोळा करून घेतले जातील. तसेच तपासणीअंती ते वर्ख अँल्युमिनिअमचे आढळल्यास तशा प्रकारचे वर्ख लावणार्‍यांवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल.


बालकांना संभवतो सर्वाधिक त्रास
अँल्युमिनिअम वर्खाचे सर्वाधिक घातक परिणाम हे बालकांवर होतात. त्यांची पचनसंस्था, किडनी व फुप्फुसावर या वर्खाचे परिणाम होतात. त्यात मेटल टॉक्सिसिटीमुळे ( धातूचे विषकारक परिणाम ) पोटदुखी व रक्तदूषितता तसेच जुलाबदेखील होऊ शकतात. वैद्य विक्रांत जाधव, आयुर्वेदतज्ज्ञ


अँल्युमिनिअमचा धोका
अँल्युमिनिअमचा अंश सातत्याने पोटात गेल्यास हिमोग्लोबीन कमी होऊन अशक्तपणा येऊ शकतो. तसेच रक्तातील पेशींच्या संख्येवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय बोनमॅरो डॅमेजचाही धोका संभवतो. डॉ. प्रितेश जुनागडे , हिमॅटोलॉजिस्ट


चांदीचा वर्ख असतो खूप महाग
चांदीचा वर्ख सध्या बाजारात केवळ काही मोजक्या सराफांकडेच मिळतो. तेदेखील 6 इंच बाय 6 इंच आणि 3 इंच बाय 3 इंच अशा आकारात मिळतात. त्यातील मोठय़ा आकाराच्या वर्खाची किंमत सुमारे 25 रुपये, तर लहान आकाराच्या वर्खाची किंमत 15 रुपयांच्या आसपास असते. नुसता हात लागला, तरी त्याचा तुकडा पडतो. प्रमोद मैंद , सराफी व्यावसायिक


आम्ही चांदीचा वर्खच वापरतो
आम्ही केवळ चांदीचा वर्खच वापरतो. आमच्याकडील मिठाईला लावला जाणारा चांदीचा वर्ख हा चांगल्या दर्जाचाच असावा, त्याची आम्ही खात्री करून घेत असतो. अन्य 90 ते 95 टक्के मिठाई विक्रेते अँल्युमिनिअम फॉइलच वापरत असले, तरी मी कुणावरही आरोप करणार नाही. मी माझ्या दालनाबाबत सांगू शकते, इतर दालनांबाबत काही सांगता येणार नाही. कल्पना पांडे, संचालक, पांडे मिठाई


आम्ही तर मिठाई खाणेच सोडले
मिठाईतील भेसळ आणि त्यावरील वर्खामुळे अनेकदा आमच्या कुटुंबाला त्रास झाला. त्यामुळे तेव्हापासून मिठाई खाणे जवळपास बंदच केले आहे. मिठाईमध्ये अँल्युमिनिअमच्या वर्खाचा वापर होतो, हे ऐकून प्रारंभी आमचा विश्वासच बसत नव्हता. मात्र डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मात्र खात्री पडली. यापुढे बेफिकीर यंत्रणांवर अवलंबून न राहता ग्राहकांना स्वत:देखील काळजी घ्यावी लागेल. विष्णुपंत सूर्यवंशी, नागरिक