नाशिकरोड- नव्या प्रारूप शहर विकास आराखड्यातून मोठ्या प्रमाणात आरक्षणे हटविण्यात आली आहेत. मात्र, विकास आराखडा प्रसिद्ध झाला, मंजूर झालेला नाही. मोठी धनशक्ती आराखड्याविरोधात उभी राहिल्याने आरक्षणे हटली म्हणून शेतकरी, मिळकतधारकांनी गाफील राहू नये, मंजुरीपर्यंत सर्वांनी संघटित राहावे, असे आवाहन शासकीय तांत्रिक सल्लागार उन्मेष गायधनी यांनी केले.
शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, डॉ. डी. जी. पेखळे, अॅड. नितीन ठाकरे, त्र्यंबकराव गायकवाड उपस्थित होते. गायधनी म्हणाले की, बिल्डर, टीडीआर माफियांना आराखडा मंजूर नाही.
धनशक्तीच्या जोरावर दोन दिवसांपूर्वीच महापालिकेतील शेंडे नामक अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून, नगरविकास सहसंचालक प्रकाश भुक्तेंना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
समितीने शेतकरी, मिळकतधारकांची दिशाभूल टाळण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आराखड्याच्या विरोधात खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे, असा प्रयत्न होत असल्याचे निवृत्ती अरिंगळे म्हणाले. अॅड. नितीन ठाकरे म्हणाले की, आराखडा मंजूर झाला नसल्याने दबाव कमी होता कामा नये. अॅड. भास्कर निमसे, त्र्यंबकराव गायकवाड, मधुकर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. सुनील बोराडे यांनी सूत्रसंचालन केले. दत्ता गायकवाड, अॅड. मुकुंद आढाव, प्रसाद पवार, शिवाजी म्हस्के, प्रकाश बोराडे, सुधाकर जाधव, हरपालसिंग बाजवा, श्रीकांत पाटील, श्रीराम गायकवाड, अशोक चोरडिया, मनोहर कोरडे, अनिल चौघुले उपस्थित होते.
७५ हरकती दाखल : विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याविरोधात हरकती नोंदविण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आठवडाभरात सोमवारपर्यंत सहसंचालकांकडे ७५ हरकती दाखल झाल्या आहेत.
समितीतर्फे जूनला मार्गदर्शनपर व्याख्यान
प्रसिद्ध झालेल्या विकास आराखड्यावर शासकीय तांत्रिक सल्लागार उन्मेष गायधनी यांचे दि. जून रोजी रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी वाजता कृती समितीच्या वतीने व्याख्यान होणार आहे. आराखड्यातील सकारात्मक, नकारात्मक बाबींवर ते मार्गदर्शन करणार असून, बाधित शेतकऱ्यांना हरकती नोंदविण्यासाठी व्याख्यानादरम्यान मार्गदर्शन करणार आहेत.
शेतकरी, मिळकत धारकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी केले आहे.