आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Because Of Lbt Businessman Goes On Strike But Business Should Start

व्यापार बंद कायम, अन् व्यवहारही सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- एलबीटीला विरोध करण्यासाठी बेमुदत बंद पुकारणार्‍या व्यापारी संघटनांमध्ये शनिवारी फूट पडून अनेक दुकाने उघडण्यात आली. त्यामुळे दोन दिवस आवश्यक खरेदी करू न शकलेल्या ग्राहकांनी तिसर्‍या दिवशी मुख्य बाजारपेठेत अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर चीजवस्तूंची मनसोक्त खरेदी केली. परिणामी, बंदच्या काळातही बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली.

दरम्यान, रविवारी राज्य पातळीवरील व्यापारी संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून, शनिवारी शहरातील व्यापार्‍यांनी बेमुदत बंद झुगारत व्यवहार सुरू केल्याने राज्य बंदला कितपत प्रतिसाद मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एलबीटी स्थगितीला नकार दिल्याने नाशिक व्यापारी महासंघाच्या अंतर्गत असलेल्या काही व्यापारी संघटनांनी बंदमधून माघार घेतल्याचे वास्तव समोर आले असून, महाराष्ट्र चेंबरमधून बाहेर पडलेल्या आणि व्यापारी महासंघ स्थापन करणार्‍या संघटनांतच फूट पडल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. सायंकाळी एका बाजूला बेमुदत बंदबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत सर्व व्यापारी संघटनांच्या अध्यक्षांची बैठक सुरू असताना दुसरीकडे मेनरोड, सराफ बाजार, बोहरपट्टी, रविवार कारंजा, शालिमार यांसह उपनगरांतील बाजारपेठा ग्राहकांनी गजबजून गेल्या.

सिडकोत मोर्चा, रक्तदान
नाशिक व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजन दलवानी यांच्या नेतृत्वाखाली सिडकोमध्ये व्यापार्‍यांनी मोर्चा काढला. मोर्चात प्रामुख्याने सिडको अध्यक्ष विजय कुलकर्णी, निवृत्ती शिरोडे, भास्कर पवार, राजन पवार, नंदलाल राठी, बळीराम शिरोडे, विजय दगडे, नाना जाधव सहभागी झाले. राणाप्रताप चौकातील जैन स्थानकात रक्तदान शिबिर घेण्यात आले. शनी मंदिरात महाआरती झाली.

एकीकडे बैठक, दुसरीकडे व्यापार
आंदोलनात सहभागी 33 संघटनांच्या अध्यक्षांची सायंकाळी पंचवटीतील पंजाब हॉटेलमध्ये बैठक सुरू होती. त्याच वेळी मुख्य बाजारपेठेतील धान्य व किराणा दुकाने वगळता सर्व दुकाने सुरू होती.

लग्नसराई व अक्षय्य तृतीया
लग्नसराई व अक्षय्य तृतीयेमुळे दोन दिवस बाजारपेठा सुरू ठेवण्याची इच्छा काही व्यापारी संघटनांनी व्यापारी महासंघाकडे केली होती. मात्र, तसा निर्णय झालेला नसताना विशिष्ट क्षेत्रातील लोकांच्या आदेशाने काही दुकाने सुरू राहिल्याचे महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले.

सराफी पेढय़ा राहणार सुरू
सराफी पेढय़ा रविवारीही सुरूच राहणार असून, एलबीटीला संघटनेचा विरोधही कायम असल्याचे नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर यांनी सांगितले.