आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणवेलींचे महाजाल काढताना दमछाक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ठेकेदार पळून गेल्यानंतर गोदावरीतील पाणवेलींचे जाळे उपसण्यासाठी महापालिका प्रशासनाने सोमवारी सकाळपासून कंबर कसली खरी, मात्र अफाट पसरलेल्या या जाळ्याची सफाई करता करता दुपारपर्यंतच कर्मचा-यांची प्रचंड दमछाक झाली. पाणवेली काढताना कर्मचा-यांना दुखापतीही झाल्या. दरम्यान, पाणवेली काढण्याच्या कामावरील देखरेखीवरून मनसे व कॉँग्रेसच्या पदाधिका-यांमध्ये चढाओढ दिसून आली.
गेल्या दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या या विषयाला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हात घातल्यानंतर सर्वच पक्ष पाणवेली निर्मूलनासाठी तत्पर झाले. पाणवेली काढण्याचे काम शनिवारीच ठेकेदारामार्फत सुरू झाले. मात्र, ठेकेदाराने पाणवेलींचे महाप्रचंड जाळे पाहूनच काढता पाय घेतला. त्यामुळे अखेर सोमवारी महापालिका प्रशासनानेच कामाला हात घातला. आरोग्य विभागाचे 75, बांधकाम व अन्य विभागांचे 58, मलेरिया विभागाचे 28 अशी जवळपास 160 कर्मचा-यांची कुमक उपलब्ध होती. या कर्मचा-यांनी महापौर यतिन वाघ यांच्या प्रभागाजवळील रामवाडी ते गंगावाडीदरम्यान गोदापात्राची स्वच्छता सुरू केली. या ठिकाणी पाणवेलींची मुळे एकमेकांमध्ये गुंतलेली असल्यामुळे कर्मचा-यांचा अक्षरश: घाम निघाला.

150 ट्रॅक्टर पाणवेली काढल्या
महापालिका कर्मचा-यांनी सुमारे सात तासांच्या या मोहिमेत 150 ट्रॅक्टर पाणवेली बाहेर काढल्या. या कामासाठी एक पोकलेन, दोन जेसीबी, नऊ टॅक्टर व एका बोटीचा वापर करण्यात आला.

दोन कर्मचारी जखमी
पाणवेली काढण्यासाठी पात्रात उतरलेल्या अर्जुन बोराडे व मनोज सोळंकी या सफाई कर्मचा-यांच्या पायाला काचा लागून त्यांना दुखापत झाली. त्यांना त्वरित महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्यात आले. एक कर्मचारी वॉटरबोटवरून पाण्यात पडला. मात्र, अन्य कर्मचा-यांनी त्याला तातडीने
बाहेर काढले.
मोहीम सुरूच राहणार
पाणवेलींचे प्रमाण जास्त आहे. मुळे खोलपर्यंत गेलेली असल्याने आकडीच्या साहाय्याने ओढण्यास अडचणी येत आहेत. रामवाडी ते होळकर पुलापर्यंत पात्र खोल असल्याने जेसीबी वापरता येत नाही. अपूर्ण यंत्रसामग्रीमुळे अडचणी निर्माण होत असल्या तरी वॉटरबोट वापरून पाणवेली काढल्या जातील.
राजेंद्र गोसावी, विभागीय अधिकारी, पंचवटी

..आणि महापौर दाखल
पाहणी करण्यासाठी स्थायी अध्यक्ष उद्धव निमसे येणार असल्याचे कळल्यानंतर मनसे नगरसेवकांनी महापौरांना पाचारण केले, अशी चर्चा होती. महापौरही तत्परतेने आले व दोघांनीही ‘संयुक्त पाहणी’ केली.