आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Being Religious But Most Corrupted Nation Dabholkar

धार्मिक असूनही देश सर्वाधिक भ्रष्टाचार्‍यांपैकी एक - दाभोळकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - या देशात अंधश्रध्दा निर्मुलनाची तीन हजार वर्षांपासूनची परंपरा आहे. चार्वाकाने त्या काळात सुरु केलेली ही परंपरा मागील शतकात महाराष्ट्रात बहरली होती. गत दीडशे वर्षांपासून कडवट समाजसुधारकांची परंपरा लाभूनही आणि बहुतांश देश धार्मिक असूनही देश सर्वाधिक भ्रष्टाचार्‍यांपैकी एक असल्याचे प्रतिपादन अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी केले.

वसंत व्याख्यानमालेतील ग. ज. म्हात्रे स्मृति व्याख्यानातील अभिरुप न्यायालयात ते बोलत होते. देशातील बहुतांश जनता धार्मिक असल्याने समाज चारित्र्यसंपन्न असायला हवा होता. मात्र, तसे झालेले दिसत नाही. कोणतींही व्यक्ती त्याच्या विवेकावर आधारीत निर्णय घेत असते.

धार्मिक असला म्हणून तो नीतीवानच असेल हे सांगता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले. हिंदु धर्मातील अंधश्रध्दांवरच आम्ही आघात करतो, हादेखील गैरसमज आहे. मात्र, जर या देशात 82 टक्के हिंदु आहेत तर त्याच धर्मातील अधिकाधिक घटना आमच्या नजरेपुढे येणे साहजिक मानले जायला हवे. तसेच दहा खोल्यांच्या घरापैकी आठ खोल्यांमधून जर अंधश्रध्देचा अंधार दूर झाला तर अन्य दोन खोल्यांमध्येही त्या उजेडाचा कवडसा पडणार असल्याचेही दाभोळकर यांनी नमूद केले.

धर्मवेडाची नांगी ठेचू शकते केवळ विज्ञान
समाजात जे अतिरेकी धर्मवेड आहे, त्या धर्मवेडाची नांगी ठेचण्याचे काम केवळ विज्ञानच करु शकते, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वाक्य सर्वार्थाने अचूक असल्याचेही दाभोळकर यांनी नमूद केले.


माणसाचे नशीब हे ग्रहगोलांवर नव्हे तर माणसाच्या मन आणि मनगटावर अवलंबून असते. त्यामुळे जिथे मुलाच्या जन्माची नक्की कोणती वेळ ठरवायची ते नक्की नसेल तर अचूक जन्मकुंडली कशी मांडायची आणि त्या आकाशस्थ ग्रहगोलांचे आपल्यावर परिणाम होतात, हे खरे कसे मानायचे ? असेही त्यांनी सांगितले. फलज्योतिष हे माणसाचे कतरुत्व खुडून टाकणारे असून ते शास्त्रच नसल्याचा दावादेखील दाभोळकर यांनी यावेळी केला.


अभिरुप न्यायालयात लोकेश शेवडे यांनी जनतेचा वकील म्हणून दाभोळकरांना विविध अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले. मात्र दाभोळकर यांनी सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तरे देत नागरिकांची दाद मिळविली. न्यायाधीश म्हणून अँड. अशोक खुटाडे यांनी कामकाज बघताना श्रध्दा आणि अंधश्रध्देमध्ये अगदी पुसटशी रेषा असल्याने दोन्ही बाजूने टोकाची मते मांडून अतिरेक करु नये, असे आदेश दिला.