आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Benjan Desai News In Marathi, Boys Town, Divya Marathi, Nashik

‘बॉईज टाऊन’चे संस्थापक प्राचार्य बेजन देसाईंचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकमधील इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचे प्रवर्तक, विविध धर्मांचे तौलनिक अभ्यासक आणि इंग्रजी, हिंदी, गुजरातीचे साहित्यिक तसेच ‘बॉईज टाऊन पब्लिक स्कूल’चे संस्थापक प्राचार्य बेजन देसाई (वय 90) यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. देवळाली कॅम्पमध्ये त्यांच्यावर पारशी समाजाच्या पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.


विविध धर्मांचा गाढा अभ्यास, वेद, उपनिषदांसह ज्योतिष, आयुर्वेद, होमिओपॅथी, रत्नशास्त्राचाही देसाई सरांचा गाढा अभ्यास होता. पारशी धर्मग्रंथ अवेस्ता आणि ऋग्वेदाचे एकमेव तौलनिक अभ्यासक, दीक्षाप्राप्त साधक तसेच संस्कृती व्युत्पत्ती आणि ध्वनिशास्त्राचे अभ्यासक म्हणूनदेखील त्यांचा प्रचंड नावलौकिक होता. पारशी धर्माचे विचारवंत असलेल्या देसाई सरांना देश-विदेशातील एकूण 12 भाषांचे सखोल ज्ञान होते.


अनेक शाळांची मुहूर्तमेढ : देसाई सरांनी बॉईज टाऊन स्कूलला चांगली शाळा म्हणून नावारूपाला आणले. फ्रावशी, सिल्व्हर ओक आणि रासबिहारी स्कूलची मुहूर्तमेढदेखील त्यांच्याच प्रेरणेने रोवण्यात आली. वेदमंदिर उभारणी, वेदवेदांग पुरस्कार आणि वेदप्रदीप मासिकाच्या निर्मितीतही त्यांचे योगदान होते. आनंदमयी मॉँ, जे. कृष्णमूर्ती, श्री श्री रविशंकर, दादा वासवानी, बाबा रामदेव, स्वामी चिन्मयानंद, भक्तराज महाराज, स्वामी गंगेश्वरानंदजी, विमलाताई ठकार यांच्याशी त्यांचा निकटचा सहवास होता. त्यांच्या मागे कन्या श्रीमती माहरुख खरास आणि नातू वास्तुविशारद बेहजाद खरास असा परिवार आहे. बुधवारी (दि. 9) देवळाली कॅम्प येथील अग्यारीत प्रार्थनासभा होणार आहे.