आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातिव्यवस्था मोडली तर देश टिकणार नाही : साहित्यिक भालचंद्र नेमाडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आपल्या देशात धर्म महत्त्वाचा झाल्यापासून देशाचे नुकसान झाले आहे. पूर्वी एकापेक्षा दुसरी जात वरची, खालची असे काहीही नव्हते. हिंदू-मुस्लिम धर्मात एकाच जातीचे लोक होते. जातींमुळे एकोपा टिकून होता. त्यामुळे धर्म नाहीसा करून जातिव्यवस्था कायम करणे आवश्यक आहे, जातिव्यवस्था मोडली तर हा देश टिकणार नाही, असे विधान ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले. रविवारी येथे गिरणा गौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत होते.

माझा जातिव्यवस्थेला नव्हे तर उच्च - नीच मानण्याच्या जातीयतेला विरोध आहे. काही शतकांपूर्वी जातिव्यवस्था होती, मात्र धर्म महत्त्वाचा नव्हता. खत्री, पिंजारी अशा जाती हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्मात होत्या. त्या क्षितिज समांतर होत्या तोपर्यंत सारे ठीक होते. मात्र, जातीयता वाढल्यानंतर आणि धर्म महत्त्वाचा झाल्यानंतर देशाचे नुकसान झाल्याचेही नेमाडे यांनी सांगितले.

इथे जास्त चांगले साहित्यिक
घुमानला जाण्यापेक्षा इथेच राहणे मी अधिक पसंत करतो. कारण तिथल्यापेक्षा इथे जास्त चांगले साहित्यिक आहेत. साहित्य संमेलन शेवटचे आहे असे जर कुणी सांगितले तरच संमेलनाला जाईन, असे म्हणत नेमाडे यांनी साहित्य संमेलनांना पुन्हा एकदा कोपरखळी मारली.

एकच भाषा टिकते म्हणून मराठी
जेव्हा कोणत्याही संस्कृतीत दोन भाषांचा वापर व्हायला लागतो तेव्हा अधिक मान मिळणारी भाषा टिकते आणि दुसरी लोप पावते. अशी उदाहरणे ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि कॅनडामध्ये घडलेली आहेत. तसेच एकाच भाषेत शिकले तर मेंदूची अधिक चांगली वाढ होते, त्यामुळे मातृभाषेतच शिक्षण हवे. विषय म्हणून शिकायला इंग्रजी, चिनी, जपानी शिकायला हरकत नाही. हे मी गेली वीस वर्ष केवळ उत्साहाच्या भरात नव्हे तर पूर्ण विचारांती बोलत असल्याचेही नेमाडे यांनी नमूद केले.