आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhanudas Kotkar Along With Three Children Get Life Imprisonment

भानुदास कोतकरांसह तिघा मुलांना जन्मठेप, नाशिक सत्र न्यायालयाचा निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित अशाेक लांडे खून प्रकरणात नगर काँग्रेसचे माजी अध्यक्ष भानुदास कोतकर यांच्यासह त्यांचे पुत्र तत्कालीन महापाैर संदीप, सचिन व अमाेल या तिघा भावांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे मृताच्या पत्नीसह १२ साक्षीदार फितूर झाले असतानाही पाेलिसांचे दाेषाराेपपत्रातील ठाेस पुरावे व सरकारी वकिलांच्या युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली.

या प्रकरणात संशयित अाराेपी भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोघांना तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. तब्बल नऊ वर्षांनतर मृताच्या कुुटुंबीयांसह फिर्यादीला न्याय मिळाल्याची भावना निकाल एेकण्यासाठी जमलेल्या जमावाकडून व्यक्त हाेत हाेती. नगर जिल्ह्यातील तेपतीरोडवरील भैरवनाथ पतसंस्थेजवळील सुलभ शौचालयाजवळ १९ मे २००८ रोजी अशोक भीमराव लांडे या लॉटरी विक्रेत्यावर तलवार, गज, हॉकीस्टीकने हल्ला झाला होता. या मारहाणीत लांडे याचा जागेवरच मृत्यू झाला हाेता. मात्र, त्यास एका खेड्यागावात खासगी रुग्णालयात दाखल करून अपघातात मृत्यू झाल्याचे भासवण्यात अाले हाेते.

पोलिसांनीदेखील अपघाताचीच नाेंद करून प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला होता. सदर प्रकरणाची कुठेही वाच्यता न करता राजकीय दबावापाेटी पाेलिस यंत्रणेनेही दुर्लक्ष केले हाेते. मात्र, लांडे यांचे मित्र शंकरराव विठ्ठलराव राऊत व पत्नी पार्वताबाई राऊत या दांपत्यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने संशयितांविराेधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये तत्कालीन काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कोतकर, तत्कालीन महापौर संदीप कोतकर, सचिन कोतकर, अमोल कोतकर यांच्यासह भाऊसाहेब उन्हवणे, राजेश धवन, विजय कटाळे, अनिल पानसंबळ, संतोष कोतकर, सुनील भुंडे, तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले, औदुंबर कोतकर, आणि सचिन सातपुते यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या अादेशान्वये तत्कालीन पाेलिस अधीक्षक कृष्णप्रकाश अाणि अपर अधीक्षक ज्याेतिप्रिया सिंह यांनी तपासाची सूत्रे हाती घेत गुन्ह्याच्या मूळापर्यंत जाऊन तपास करून काेतकर कुटुंबीयांसह सर्वच संशयितांना अटक केली. तपास अधिकाऱ्यांनी मुदतीत तपास पूर्ण करत सुमारे ३०० पानांचे दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले हाेते. सुरुवातीला अहमदनगर न्यायालयात खटला सुरू असताना संशयितांकडून यंत्रणेवर दबाव अाणण्याची शक्यता वर्तवत ताे नाशिक न्यायालयात वर्ग करण्यात अाला.

दोन वर्षांपासून सुनावणी : गेल्या दाेन वर्षांपासून सदर खटल्याची नियमित सुनावणी सुरू हाेती. खटल्यात तब्बल ६१ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सत्र न्यायधीश एस. अार. कदम यांनी भानुदास काेतकर याच्यासह त्याच्या तीन मुलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, कर्डिले यांच्यासह भाऊसाहेब उन्हवणे, राजेश धवन, विजय कराळे, अनिल पानसंबळ, संतोष कोतकर, सुनील भुंडे, औदुंबर कोतकर, सचिन सातपुते यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

राजकीय खळबळ : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा हा निकाल असून या निकालामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय समिकरण बदलणार आहे. या खटल्यात विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव असल्याने कोतकर यांच्यासह त्यांची देखील राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्य कारण गुलदस्त्यात : लांडे यांचा खून कशामुळे झाला याबाबत काहीच ठोस माहिती नसूनदेखील केवळ साक्षीपुरावे आणि परिस्थितीजन्य पुरावे आणि फिर्यादीच्या इच्छाशक्तीच्या बळावर नाशिक न्यायालयाने ही एेतिहासिक शिक्षा ठोठावली.