आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bharat Ratna Award Demand For Savarkar, Divya Marathi

स्वा. सावरकरांना मरणोत्तर भारतरत्नच्या मागणीचा करणार ठराव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इंग्रजी सत्तेच्या प्रचंड जबड्यातून भारतमातेला सहीसलामत बाहेर काढण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव अव्वल स्थानावर आहे. स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावणार्‍या या स्वातंत्र्यवीराविषयी सरकारी व्यवस्थेला काहीही सोयरसुतक दिसत नाही. ही बाब लक्षात घेऊन अभिनव भारत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वा. सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशा मागणीचा ठराव तयार केला आहे. हा ठराव सावरकर जयंतीनिमित्त (दि. 28) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार आहे.

स्वा. सावरकर जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 28) या आशयाचा ठराव संघटनेतर्फे पारित करण्यात येणार आहे. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार चित्रपट अभिनेते तसेच विविध क्रीडापटूंना देण्यात येतो. मात्र, ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, त्या क्रांतिकारकांना मात्र डावलण्यात येत असल्याची खंत अभिनव भारत संघटनेने व्यक्त केली आहे.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार केंद्रात कार्यरत झाले असून, सर्व क्षेत्रात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे स्वा. सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. त्यानुसार, हा ठराव पारित करून पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

ब्रिटिशांच्या जोखडातून भारताची मुक्तता करणे हे साध्य व सशस्त्र क्रांती हे साधन हे ब्रीद मनी धरून स्वा. सावरकरांनी अभिनव भारत संघटनेची स्थापना केली होती. ही संस्था आजही कार्यरत आहे. 1899 मध्येच सावरकर व त्यांच्या सहकार्‍यांनी राष्ट्रभक्त समूह नावाची गुप्त संस्था स्थापन केली व तिला पोषक म्हणून 1900च्या प्रारंभी मित्रमेळा या नावाची उघड कार्य करणारी एक संस्था स्थापली. पुढे 1904मध्ये सावरकरांनी मित्र मेळ्याचे अभिनव भारत या संस्थेत रूपांतर केले.
नवीन सरकारकडे मागणी करणार
स्वा. सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी अभिनव भारत संघटनेची मागणी आहे. केंद्रात नवे सरकार आल्यामुळे अनेक नव्या गोष्टी घडत आहेत. त्यानुसार, सावरकर जयंतीनिमित्त आम्ही ही मागणी करत आहोत. सूर्यकांत रहाळकर, विश्वस्त, अभिनव भारत संघटना

अंदमानमध्ये राष्ट्रीय स्मारक उभारावे
ब्रिटिश सरकारने स्वा. सावरकरांना अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी पाठविले होते. त्याठिकाणी सावरकरांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, तसेच देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्व क्रांतिकारकांच्या स्मृती जपण्यासाठी योग्य ठिकाणी स्मारक उभारण्यात यावे, असेही दोन ठराव करण्यात येणार आहेत.