आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bharatiya Vidharthi Sena Organise Agitation Against ITI Inactive

आयटीआय गोंधळाविरोधात भारतीय विद्यार्थी सेनेचा ठिय्या आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने संतप्त होत भारतीय विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते व सुमारे 300 विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या दालनातच ठिय्या मांडला. सहायक संचालक बी. आर. शिंपले यांनी संस्थेत येऊन आठ दिवसांत गुणवत्ता यादी जाहीर करण्यासह प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिल्यावरच आंदोलन मागे घेण्यात आले.

शासनाने या वर्षापासून राज्यभरात आयटीआयची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू केली. मात्र, पहिल्या दिवसापासूनच या प्रक्रियेचा फज्जा उडाला. सुरुवातीला संकेतस्थळच सुरू होत नव्हते. कसबसे ते सुरू झाले, तर अर्ज कुठे करावयाचे त्याची माहितीच दिसेना. त्यात 15 दिवसांचा कालावधी गेला. त्यानंतर संकेतस्थळ पूर्णपणे सुरू झाले; परंतु अर्ज भरण्यास तीन तासांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने काही ठिकाणी थेट लिखित अर्ज स्वीकारण्यात आले.

अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी 18 जुलैला व 19 जुलैला मूळ कागदपत्रांसह प्रवेश दिले जाणार होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी संस्थेत हजेरीही लावली. मात्र, रात्री आठ वाजेपर्यंत ती जाहीरच झाली नाही. तसेच, संस्थेने विद्यार्थ्यांना त्यांचे इमेल आयडी व पासवर्डही दिले. मात्र, त्यात कुठल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश कुठल्या ठिकाणी आणि कोर्ससाठी झाला याची माहितीच समजत नाही. एकाच विद्यार्थ्याचे नाव पाच-पाच ठिकाणी आल्यानेही गोंधळ झाला आहे. तर काहींचे नावच जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली असून आश्वासनानुसार आठ दिवसांत प्रक्रिया सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा विद्यार्थी सेनेने दिला आहे. महानगरप्रमुख संदीप गायकर, अमोल इघे, स्वप्नील धनकर, रूपेश पालकर, वैभव ढिकले आदी आंदोलनात सहभागी झाले होते.


तर पुन्हा आंदोलन..
महिनाभरापासून हा गोंधळ सुरू असून, आता इच्छुक विद्यार्थी वैतागले आहेत. सहसंचालक बी. आर. शिंपले यांनी मुंबईतील वरिष्ठ अधिकार्‍यांशी फोनवरून चर्चा केली असून, आठ दिवसांत गुणवत्ता यादी जाहीर करण्याचे सांगितले आहे. तसे न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल. योगेश बेलदार, जिल्हाप्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना


प्रक्रिया लवकरच पूर्ण
संचालक व सहसंचालकांची याबाबत मुंबईत चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. कोर्सनिहाय निवड यादी जाहीर करून निवडपत्रे लवकरच दिली जातील. ही सर्व केंद्रीय प्रक्रिया असल्याने स्थानिक स्तरावर हस्तक्षेप करता येत नाही. सोमवारच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल. बी. आर. शिंपले, सहायक संचालक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था