आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो मातांना सुखकर मातृत्व देणारी माय, अडाणी असून वयाच्या ३५व्या वर्षापासून करताय दायीचे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वैद्यकीय शिक्षणाचा गंध नसताना हजारांहून अधिक मातांची प्रसूती करणाऱ्या ९७ वर्षीय वृद्ध महिला आजही ग्रामीण भागात अडचणीच्या वेळी धावून जातात. आरोग्याच्या मूलभूत सुविधा नसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खेड्यापाड्यांत या दायीने अडलेल्या अनेक माउलींचे मातृत्व सुखकर केले आहे.

हिरडी गावात राहणाऱ्या भोराबाई खोटरे वयाच्या ३५ व्या वर्षांपासून महिलांची प्रसूती करत आहेत. भोराबाई प्रारंभी सासूबाईंना या कामी मदत करायच्या. हे काम त्या सासूकडून शिकल्या. सासूबाईंच्या निधनानंतर अडलेल्या महिलांची प्रसूती करण्यास सुरुवात केली. भोराबाईंच्या हाताने बाळंतीण कोणत्याही त्रासाविना मोकळी होत असल्याने त्यांना इतर भागांतून बोलावणे सुरू झाले.
खेड्यापाड्यात प्रसूती करायची म्हटली की त्या गावचे लोक, नातेवाईक लगेच भोराबाईंना नेण्यासाठी हिरडी गाठू लागले. हिरडी गावापुरते भोराबाईंनी महिलांची प्रसूती करता पंचक्रोशीतील तब्बल एक हजारांहून अधिक महिलांची प्रसूती करत मातृत्व सुखकर केले आहे. वयाच्या ९७ वर्षांपर्यंत भोराबाईंनी कित्येकांची प्रसूती करण्याचे काम केले. आज वृद्धत्वामुळे त्यांना हे काम होत नसले तरी अनुभवाच्या माध्यमातून अडलेल्या महिलांच्या प्रसूतीला त्या मदत करत आहेत.
डॉक्टरांनाही भोराबाईंचा आधार
हिरडीगावातील आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला अडचणीत असेल तर डॉक्टर नर्सही भोराबाईंना बोलावून त्यांच्या सल्ल्यानुसार प्रसूती करून घेतात. तसेच, खूपच त्रासदायक असेल तर भोराबाई याही शहरातील दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला देतात. मात्र सध्या वृद्धत्वामुळे त्या कोणतीही रिस्क घेता कोणाच्या मातृत्वाला अडचणीत आणत नाही.
पंचक्रोशीतील दायी
त्र्यंबकेश्वरतालुक्यातील हिरडी, गणेशगाव, रोहिले, पिंप्री, माळेगाव या पंचक्रोशीतील हजारांहून अधिक महिलांची प्रसूती करत भोराबाईंनी आरोग्याच्या सुविधांची जणू उणीवच भासू दिली नाही. आज हिरडी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र झाले असले तरी भोराबाईंच्या मार्गदर्शनाशिवाय बाळंतीण मोकळी झाली नाही, असे उदाहरणही नाही.
अजूनही त्यांचा वाटतो आधार
भोराबाई खोटरे या आमच्या गावातील एक दायीच नसून, पंचक्रोशीतील महिलांचा आधार बनल्या आहेत. माझ्या जन्माच्या वेळीही त्यांनीच प्रसूती केल्याचे आई सांगते. आज त्या हे काम करत नसल्या तरी त्यांच्यावर सर्वांचा विश्वास असल्याने मार्गदर्शनातून बाळंतीण प्रसूतीसाठी जाते.
-विष्णू खोटरे, रहिवासी,हिरडी
बातम्या आणखी आहेत...