नाशिक- परदेशातगोदाकाठाचा गौरव होतो. सावंत बंधुंनी रेखाटलेल्या चित्राला प्रथम पारितोषिक देऊन त्या क्षणी त्या चित्राचे चीनमध्ये टपाल तिकीट होऊन गौरव होतो, जर्मनीतही तेच घडते.
आपल्याकडे मात्र गोदाकाठावर लोकांनी येऊच नये म्हणून बाम्बू (बल्ली बॅरेकेटिंग) लावले जातात. ‘नहीं जाने का, बैठे रहो घर पे, ब्रिज के उपर बाम्बू, नीचे बाम्बू.. अरे हे काय आहे’, असे म्हणत अामदार छगन भुजबळ यांनी चिमटे घेत भाजपावर टीका केली. याला मात्र उपस्थितांनी हास्याचा खळखळाट करत मनापासून दाद दिली.
महात्मा फुले समाज विकास संस्थेच्या विविध पुरस्कार वितरण साेहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून भुजबळ बोलत होते. प्रारंभी त्यांनी ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग अण्णा गायकवाड यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पुरस्कारार्थींचे अभिनंदन करताना ते म्हणाले, अचूक लोकांना हे पुरस्कार मिळाले आहेत. कलेची किंमत कोणीच करू शकत नाही, ती कला लोकांना भावली पाहिजे. यावेळी व्यासपीठावर प्रा. सुहास फरांदे, चंद्रकांत बागुल, डॉ. कैलास कमोद, नीलिमा सोनवणे, रमेश थोरात, बाजीवराव तिडके, राजेंद्र गाडेकर, भि. रा. सावंत आदी उपस्थित होते.
चिमटे अन् हास्यतुषार
(आमदारफरांदेंना उद्देशून) आता तुमचं राजकारणातलं हायस्कूल संपलं. आता तुम्ही कॉलेजमध्ये आल्या आहात. त्यातही यशस्वी व्हाल या शुभेच्छा. म. फुले, सावित्रीबाईंनी दगड-धोंडे खाल्ले नसते, तर देवयानीताई आज तुम्ही या मंचावर बसलेल्या नसत्या.
(माध्यमांना उद्देशून) चित्र हे कोट्यवधी रुपयांना विकत मिळतात, मी देखील घेतलेले अाहेत. आता हे वेगळं सांगायलाच नको की, माध्यमांनी ती १०० कोटींची जाहीर केलीच होती.
(एमएफ हुसेन यांच्या बाबतीत) आपल्याला एम. एफ. हुसेन यांची किंमत नाही. आपण त्यांना घालवायलाच निघालो होतो. पण कतारमध्ये एका शहाने... हा शहा म्हणजे आपल्या पटेल, शहांपैकी नाही बरं का.. (फरांदेंकडे बघत मोदींकडे रोख). हुसेन यांना या शहाने भिंतीवर चित्र काढायला सांगून कोट्यवधी बिदागी दिली होती.
हे आहेत समाजरत्न पुरस्काराचे मानकरी
संतूजी पाटील, सदाशिव माळी, मकरंद सोनवणे, सोपान खैरनार, दीपक मौले, तुकाराम मंडलिक, अशोक मंडलिक.
कलेला हवा राजाश्रय
जगभरात पुरस्कार मिळाले, पण घरची शाबासकी अधिक आनंद देणारी असते. गुजरात सरकार कलेला अनुदान देते, राजश्रय तिथे आहे. आपल्याकडे १०-२० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाते. आजचा सन्मान वा. गो. कुलकर्णी, शिवाजी तुपे याच्या चित्रपरंपरेचा सन्मान आहे. राजेशसावंत, प्रफुल्ल सावंत, (नागरी सन्मान)
महात्मा फुलेंना ‘भारतरत्न’ मिळायलाच हवा
आपल्या मातीत पुरस्कार मिळाल्याचा आनंदच आहे. पण ज्यांच्या नावाच्या संस्थेकडून हा पुरस्कार मिळतो आहे. त्यांना भारतरत्न मिळायलाच हवा यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ताई (देवयानी फरांदे) सत्तेत आपला पक्ष आहे. आपण मुद्दा उचलावा. ज्या घरात क्रांतीज्योतींचं नाव घेतो तिथेच कोकिळेचं व्रत केलं जातं. सांगण्याचा मुद्दा हा की, जे वाचतो ते आचरणात आणण्याची गरज आहे. अजितचव्हाण, (परिवर्तन पत्रकारिता पुरस्कार)
सत्काराने कामाची प्रेरणा
कधीराजकारणात येईल असे वाटले नव्हते. १९९७मध्ये आमचा वॉर्ड महिला राखीव झाला आणि राजकारणात आले. यावेळी उभी राहिले तेव्हा अनेक जण म्हणाले, मी पडण्यासाठी उभी राहिले. यशासाठी पराभव पचवण्याची शक्ती पाहिजे. हा माझा सत्कार नाशिककरांमुळेच आहे.
आमदारदेवयानी फरांदे, (दिव्य ज्योती पुरस्कार)
‘दिव्य ज्योती’ पुरस्कार आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते स्वीकारताना चित्रकार सावंत बंधु, पत्रकार अजित चव्हाण, आमदार प्रा. देवयानी फरांदे.