आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांचे वादग्रस्त ओएसडी बेडसे यांची बदली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकरने पदोन्नतीसाठी एका वरिष्ठाला पैसे देण्यासाठी घरात चार कोटींची माया जमा केल्याची सार्वत्रिक वाच्यता होती. या पार्श्वभूमीवर बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे वादग्रस्त विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) संदीप बेडसे यांची मुंबईला बदली करण्यात आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही बेडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

चिखलीकर व वाघ यांना गेल्या आठवड्यात लाच घेताना पकडण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली असता चिखलीकरच्या घरी सुमारे चार कोटींची रोकड हस्तगत करण्यात आली होती. त्याने पदोन्नतीसाठी खात्यातीलच एका वरिष्ठ अधिकार्‍याला देण्यासाठी ही रक्कम जमा केल्याची चर्चा होती. त्यानंतर चौकशीत चिखलीकर व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे 20 कोटींची मालमत्ता असल्याचे उघडकीस आले.

एका कार्यकारी अभियंत्याकडे एवढी मालमत्ता सापडल्यानंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकारी व खात्याच्या कारभारावरही शंका उपस्थित होऊ लागली. गेल्या पंधरवड्यात बेडसे यांचा वाढदिवस ज्या पद्धतीने धुळे जिल्ह्यात साजरा झाला, तेव्हापासून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यावर पाळत ठेवली होती. दरम्यान, यापूर्वी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांबाबत आरोप झाले होते, त्या वेळी पाटील यांनी त्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हसे-पाटील यांची उचलबांगडी केली होती.