आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारांचे सरकारी ‘कदर’दान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एखादी काडी हाताने सहज माेडावी अशा क्रूरकर्मापद्धतीने वारंवार हाेणारे खून, गुन्हेगारांच्या मुसक्या अावळण्याचे साेडून त्यांचं अादरतिथ्य किंबहुना गुन्ह्यातून सहीसलामत सुटका कशी हाेईल, यासाठी पाेलिसांचीच चालणारी धडपड पुढे हेच गुन्हेगार पुराव्याअभावी सुटले की त्यांना राजकीय पक्षाची झूल पांघरूण त्याखाली पावन करून घेण्याचे प्रकार ‘तीर्थभूमी’ ते ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमधील सुजाणांना अस्वस्थ करणारे अाहेत. अादर्शांपेक्षा दादागिरीद्वारे अधिकाधिक सदस्य कसे िनवडून येतील, यातच राजकीय मुखंडांना धन्यता वाटतेय. परिणामी त्यांच्या अंकुशाखाली कार्यरत पाेलिसा यंत्रणेलाही काेणाचेच भय उरले नसून, गुन्हेगारांच्या ‘सरकारी मेहरबानी वा कदरदानी’मुळे शहरात सध्या अराजकतेचे धुके गडद हाेऊ लागल्याची विदारक वस्तुस्थिती अाहे.
राजकीय ‘भाईचारा’
साधन शुचिता, शिस्त-शिरस्ता अशा तत्त्वांची बाता करणारे पक्ष असाे की सरळपणे समाजातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींच्या जाेरावर राजकारण करणारे.. सर्वांचाच वाढता राजकीय ‘भाईचारा’ चिंतेची बाब ठरतेय. गुन्हा सिद्ध हाेण्यापूर्वीच त्यांच्याकडे महत्त्वाची पदं देऊन एकप्रकारे समाजमान्यता देण्याचीच धडपड सध्या राजकीय पक्ष करताना िदसतात. असं करताना त्यांना समाजापेक्षा स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची वाटते अाहे. अापला मतदारसंघ राखणं िनवडणुकीत यशस्वी हाेण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांना निरागस असल्याचा साक्षात्कार हाेतोय त्यातून अशा व्यक्तींसाेबत समाजात मुक्तपणे वावरण्यापर्यंत मजल गेली अाहे. मात्र, अशा व्यक्तींमुळे सामान्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे भीतीचे तरंग अशा राजकारण्यांना अाेळखता अालेले नाहीत. यापूर्वी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादीवर गुन्हेगारांशी असलेल्या संबंधावरून बरीच टीका झाली हाेती. खुद्द भुजबळ यांनाच शुभेच्छा देणाऱ्या काही वादग्रस्त चेहऱ्यांविषयी नाराजीचा सूर उमटला हाेता. मात्र, त्याची पुरेशी दखल घेतली गेली नाही. परिणामी लाेकांनी अापल्यापद्धतीने जी काही उपाययाेजना करायची ती केली. दुर्दैवाने अाता अशीच काहीशी परिस्थिती भाजप काही प्रमाणात शिवसेनेसाेबत दिसत अाहे. सत्तेमुळे या पक्षाभाेवती कार्यकर्त्यांचं माेहळ जमत असून त्यात चारित्र्य तपासण्याएेवजी वजन लक्षात घेत पदांची खैरात करण्याचे प्रकार सुरू अाहेत. यात सामान्य पक्ष कार्यकर्ता अस्वस्थ झाला अाहे. विशेष कार्यकारी अधिकारीपदाच्या यादीतून त्याची प्रचिती येत अाहे. पाेलिस खात्याच्या चारित्र्य तपासणीत अशा चेहऱ्यांवरचा मुखवटा हटेल मात्र, उघडपणे राजकारण्यांच्या खांद्याला खांदा लावून फिरणाऱ्यांचा बंदोबस्त होईपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्तींचा पाडाव हाेणार नाही. उद्या पाेलिस खात्याकडून निःपक्षपातीपणे कारवाईची अपेक्षा असली तरी, जाेपर्यंत राजकारणी अशा व्यक्तींमागील पाठिंब्याचा झेंडा काढणार नाही, ताेपर्यंत सामाजिक शांतता प्रस्थापित हाेणे वा गुन्हेगारीचा अालेख तळाला जाणे शक्य हाेणार नाही.
पी.एल. ग्रुप अर्थात रिपाइं नगरसेवक प्रकाश लाेंढे मित्रमंडळातील काही संशयित अाराेपींनी दाेन सराईत गुन्हेगारांना गाेळ्या झाडून खून केल्याचं प्रकरण सध्या चवीने चघळलं जातं अाहे. या प्रकरणात लाेंढे यांचे पुत्र भूषण यांनाही पुरावे नष्ट केल्याप्रकरणी संशयित अाराेपी करण्यात अालं अाहे. या प्रकरणामुळे भूषण यांचा धुमधडाक्यात हाेणारा शाहीविवाहदेखील अडचणीत अाला हाेता. लाेंढे ग्रुपवर यापूर्वी गुन्हेगारीशी संबंधित अनेक गंभीर अाराेप असल्यामुळे दुहेरी हत्याकांडापेक्षा शाहीविवाह हाेणार किंवा नाही, याचीच चर्चा खमंगपणे चघळली गेली. असाे, या प्रकरणामुळे राजकारण गुन्हेगार या दाेघांचं परस्पर संबंध वा अतूट नातं चर्चेत अालं. तसं हे नातं काही जुनं नाही. अगदी अंडरवर्ल्डमधील कुख्यात डाॅनला लाभलेले राजकीय वरदहस्तही वारंवार प्रकाशात अाले. दाऊद इब्राहिमसारख्या डाॅनला परदेशात पळून जाण्यासाठी तत्कालीन मंत्र्यासह पाेलिस खात्यातल्या अधिकाऱ्यांनी केलेली मदतीची चर्चाही अनेक वर्षांपासून गाजत अाहे.
दुर्दैवं म्हणजे, अाता तशाच अभद्र युतीचं प्रतिबिंब छाेट्या शहरांमध्ये दिसू लागल्यामुळे सामाजिक पटलावर धाेक्याची घंटा वाजू लागली अाहे. म्हणूनच, लाेंढे यांच्या संशयित ग्रुपमधील कार्यकर्त्यांकडून झालेल्या तथाकथित हत्याकांडामुळे सामाजिक शांतता कायद्याचे रक्षण करणाऱ्यांची बेपवाईही वादात सापडली अाहे. तसे पाहिलं तर, खूनसत्रामुळे गेल्या काही दिवसांपासून शहराचं वातावरण ढवळून निघालंय. काेणाचाही सहज खून करण्याचा प्रकार गुन्हेगारांना डाव्या हाताचा मळ वाटतोय. पूर्वी हाफ मर्डर म्हणजे गंभीर चर्चचा विषय असे. मात्र, अशा प्रकारात जखमी व्यक्तीची साक्ष शिक्षेपर्यंत सहज पाेहोचवू शकते याचं भान ठेवून ‘ना बजेगा बास ना बजेगी बासुरी’ अशा विचारातून टाेकाची भूमिका घेतली जात अाहे. त्यातून प्रतिस्पर्ध्याचा काटा काढताना स्वतःचं साम्राज्य अधाेरेखित करण्यासाठी खूनासारखा मार्गच याेग्य, असा समज तर वृद्धिंगत झाला नाही ना, असा संशय बळावू लागला अाहे. गुन्हेगारांना कडक शासन करून असे धाेकेदायक समज खाेडून काढण्यासाठी दुर्दैवाने पाेलिसांकडून प्रयत्न हाेताना दिसत नाहीत. किंबहुना मागील काही घटना बघितल्यानंतर साक्षीदारांची सुरक्षितता धाेक्यात अाणण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याचं दिसतं अाहे.

साक्षीदार फाेडणं, दबाव टाकून साक्ष बदलून घेणं असे प्रकार वाढत असून, अशा साक्षीदाराला संरक्षण देऊन गुन्हा सिद्ध करून घेण्याची तत्परता पाेलिसांकडून दाखवली जात नसल्याचं बाेललं जातंय. एवढंच नव्हे तर, गुन्हा दाखल झाल्यानंतर ९० िदवसांत अाराेपपत्र दाखल करताना खाकीच्या मदतीने हाेणाऱ्या कथित फेरफारामुळे कायद्याच्या कचाट्यातून कशी सुटका करून घ्यायची याचं पेटंटच बाजारात उपलब्ध असल्याची दुर्दैवी चर्चा अाहे. दुहेरी हत्याकांडानिमित्त त्यास पुष्टी मिळत असून, सातपूरमधील एका पाेलिस उपनिरीक्षकाकडून कायदेशीर कारवाईची प्रत्येक माहिती संशयितांना कशी पुरवली जात हाेती त्याअाधारावर कायदेशीर पेच निर्माण करून सुटकेच्या दिशेने कशी पावले टाकली जात हाेती, यावरही नुकताच ‘प्रकाश’ पडला. परिणामी, ज्यांच्याकडे कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी अाहे त्यांनीच अापली निष्ठा गुन्हेगारांच्या खुंटीला टांगल्याचे विदारक सत्य बाहेर अालं. अर्थात, हे केवळ लाेंढे यांच्याच प्रकरणात घडलं असं नाही.

यापूर्वी तत्कालीन पाेलिस अायुक्त विष्णुदेवमिश्रा वा कुलवंतकुमार सरंगल यांच्यासारख्या धडाकेबाज अायुक्तांनी राजकीय मेहरनजरेत गब्बर हाेणाऱ्या काही गुन्हेगारांविरुद्ध कारवाई केल्यावर असे अनेक फंदफितुरी करणारे उजेडात अाले हाेते. सराईत गुन्हेगारांना पाेलिस खात्यातल्या खडा न् खडा हालचाली पाेलिस कर्मचारी पुरवत असल्याचं फाेन टॅपिंगमधून समाेर अालं. अर्थात तत्कालीन पाेलिस अायुक्तांनी काेणतीही भीडभाड ठेवता अशी अभद्र युती उद‌्ध्वस्त केली. त्यानंतर एका खंडणी प्रकरणात पाेलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्याने गुन्हेगारांच्या हातात हात गुंफून भूमिका निभावल्याचं उघड झालं. तीन वर्षात नाशिकमधील जमिनीचे भाव गगनाला भिडल्यानंतर काही गुन्हेगारांशी भागीदारी करून वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी कशापद्धतीने खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला, त्याचेही अनेक सुरस िकस्से चर्चिले जातात. गुन्हेगार पाेलिसांचा वाढता दाेस्ताना लाेकांना माहीत अाहे, असं नाही मात्र, त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराविषयी तक्रार करण्याची भीती अाता नागरिकांना वाटत अाहे. ही परिस्थिती अराजकतेला अामंत्रण देणारी सामाजिक शांतता धाेक्यात असल्याचं दर्शक अाहे. त्यामुळेच यंदा शिवसेनेसारख्या पक्षाने पाेलिसांच्या कामकाजावर सरळ प्रश्नचिन्ह उपस्थित करून अापल्या संपर्क कार्यालयामार्फत पाेलिसांवर वचक ठेवणारी समांतर व्यवस्था उभी करण्याची घाेषणा केली.
पाेलिस खात्याची कमान ज्यांच्या खांद्यावर अाहे त्या अायुक्त जगन्नाथन यांची गुन्हेगारीविराेधातील धडपड लपून राहिलेली नाही. त्यांचे प्रयत्न प्रामाणिक असले तरी, कारवाईला धार येणं अपेक्षित अाहे. त्यांचा स्वभाव काहीसा शांत असल्याचा फायदा पाेलिस खात्यात िनव्वळ मलईमागे धावणाऱ्या काही अधिकारी वा कर्मचाऱ्यांकडून घेतला जातोय. यापूर्वी सरंगल यांच्या कार्यकाळात पाेलिस कर्मचारी प्रत्यक्ष भेटणं तर साेडा मात्र गुन्हेगारी प्रवृत्तींचा फाेन घेण्याची हिंमत करत नव्हते. सरंगल यांनी अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत खाकी गुन्हेगारीचा मिलाफ हाेऊ देण्याची दक्षता घेतली हाेती.

सातपूर प्रकरणात उपनिरीक्षकाला निलंबित करून जगन्नाथन यांनी तसंच पाऊल टाकल्याची बाब नाशिककरांसाठी समाधानकारक अाहे. मात्र, अाता गुन्हेगारांपेक्षा पाेलिसांवरच डाेळ्यांत तेल घालून नजर ठेवणं हेच त्यांच्यासाठी माेठं अाव्हान असेल. खाकीतील गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप लावला, तर शहरातील बहुतांश गुन्हेगारी अाटाेक्यात येऊ शकेल. मात्र, त्यासाठी त्यांना प्रवाहाविराेधात म्हणजे खात्यांतर्गत लढा देण्याची कामगिरी करावी लागेल. या लढाईत त्यांना प्रमुख अडथळा राजकारणातील गुन्हेगारी प्रवृत्तींचा असेल. अापल्या बगलबच्चांना संरक्षण देण्यासाठी जगन्नाथन यांच्यावर बदली, बदनामी अशा अनेक अडचणींची पेरणी केली जाईल, मात्र त्यातून तावून सुलाखून ‘गुन्हेगारीमुक्त नाशिक’ करण्याचे खरं अाव्हान अायुक्तांवर असेल. जमेची बाब म्हणजे पाेलिस उपायुक्त एन. अंबिका यांच्यासारख्या एका महिला अधिकाऱ्याची समर्थ साथ त्यांना असून, त्यांच्यासारखे धडाकेबाज कामगिरी करणारे दाेन-चार चेहरे नाशिकमधील गुन्हेगारीचा अालेख तळाला अाणण्यासाठी पुरेसे ठरतील यात तीळमात्र शंका नाही.