आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडी कामगारांच्या प्रश्नांसाठी अडवली पालकमंत्र्यांची गाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विडी कामगारांच्या प्रश्नांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. विडी कामगार युवक काँग्रेसचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. बैठकीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले पालकमंत्री राम शिंदे यांची गाडी अडवून आंदोलकांनी त्यांना घेराव घातला.
विडी बंडलांवरील धोकाचित्राच्या अटीवरून देशभरातील विडी कारखाने एप्रिलपासून बंद आहेत. त्यामुळे विडी बनवणारे कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संवैधानिक मार्गाने वारंवार आंदोलन करूनही कामगारांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. खरीप आढावा बैठकीसाठी सकाळी पालकमंत्री शिंदे यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला. मुख्य प्रवेशद्वारासमोर महिला विडी कामगारांनी त्यांचा ताफा अडवून गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला. आंदोलक महिला कामगारांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना दूर केले. त्यानंतर पालकमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात गेला. त्यांनतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत घंटानाद आंदोलन केले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विडी बंडलांवर ८५ टक्के धोकाचित्र छापण्याचे बंधन रद्द करण्याची मागणी केली. कारखाने सुरू करून रोजगार द्यावा, तसेच बंद कालावधीतील रोजगार देण्याची मागणीही त्यांनी केली. विडी कामगार संघटनांचे पदाधिकारी, विडी कामगार महिला, तसेच युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन नगर विडी कामगार संघटनेच्या वतीने पालकमंत्री राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले. सोलापूरप्रमाणे शहरातील विडी कामगारांना शिधापत्रिकेवर मोफत धान्य पुरवठा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. पालकमंत्री शिंदे यांनी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा करून विडी कामगारांना मोफत धान्य पुरवण्याचे आश्वासन दिले. शंकर न्यालपेल्ली, सुधीर टोकेकर, शंकरराव मंगलारप, व्यंकटेश बोगा, पुरुषोत्तम बोगा, कमलाबाई दोंता, कविता मच्चा, शोभा बिमन, शारदा बोगा, लक्ष्मी कोडम, सुमित्रा जिंदम, शोभा पासकंटी, संगीता गाली, सरोजनी दिकोंडा उपस्थित होते.