आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहनबाजारांचा पसारा ; नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहराच्या विविध भागांतील वाहनबाजारांना प्रतिसाद वाढल्याने आता त्यांचा पसारादेखील वाढला आहे. वाहनबाजारातील वाहने आता मुख्य रस्त्यांच्या मध्यापर्यंत येऊन पोहोचल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि पादचार्‍यांच्या त्रासात भरच पडली आहे. अनेक वाहनबाजारांना स्थानिक नेत्यांचाच वरदहस्त असल्याने त्यांच्या मुजोरीचाही जाच आसपासच्या दुकानदारांना आणि नागरिकांना सहन करावा लागत आहे.

प्रारंभीच्या काळात गाड्यांचे प्रमाण फारसे नसल्याने त्या दुकानात किंवा फार तर थोड्याफार पुढील जागेत मांडल्या जात होत्या. मात्र, हा पसारा हळूहळू वाढत जाऊन या वाहनबाजारांनी आसपासची जागा गिळंकृत करण्याबरोबरच थेट मुख्य रस्त्यापर्यंतचा भाग व्यापला आहे. त्यामुळे या परिसरातून पादचार्‍यांना भर रस्त्यातून चालण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे पादचार्‍यांनाच छोट्या-मोठय़ा अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहनबाजाराच्या परिसरात ‘बॉटल नेक’ तयार होऊन गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी हे नित्याचेच चित्र झाले आहे.

या त्रासांचा अनुभव सिडकोतील त्रिमूर्ती चौकात, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या सर्व्हिसरोडजवळ आणि रामवाडीच्या वाहनबाजाराजवळ कमी-अधिक प्रमाणात नागरिकांना येतोच आहे. त्रिमूर्ती चौक तर अत्यंत वर्दळीचा असून, रामवाडी व इंदिरानगरचा भागही सायंकाळी खूपच गजबजणारा असल्याने तिथून जाणार्‍या वाहनचालकांना याचा नेहमीच त्रास होतो. अनेकदा या ठिकाणी अपघात घडतात. त्याचे कारण वाहनबाजारच असते.
हा विषय महापालिकेच्या अखत्यारीत - वाहनबाजारातील वाहनांची विक्री, त्यांची मांडणी हा विषय सर्वस्वी महापालिकेच्या प्रशासनाशी निगडित आहे. याबाबत वाहतूक पोलिस शाखा जबरदस्तीने काहीही करू शकत नाही. प्रथम महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने याबाबत लक्ष घालणे आवश्यक आहे. संजीव ठाकूर, सहायक पोलिस उपआयुक्त, वाहतूक शाखा

अद्याप तरी कोणाची तक्रार नाही - कोणत्याही वाहनबाजाराबाबत अद्याप नागरिकांकडून लेखी वा तोंडी तक्रार आलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्याचा प्रश्नच नाही; मात्र कोणत्याही वाहनबाजाराच्या गाड्या मुख्य रस्त्यापर्यंत आणत असल्याचे निदर्शनास आले तर त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. दत्तात्रय गोतिसे, उप आयुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका