आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोवेस्टच्या माध्यमातून ‘एचपीटी’त कंपोस्ट खत प्रकल्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाविद्यालयांच्या आवारात भरपूर झाडे, गार्डन्स अशी स्थिती नाशकातील विविध महाविद्यालयांमध्ये पाहायला मिळते. पण, त्या झाडांचा पालापाचोळा किंवा बायोवेस्ट या सगळ्याचे काय होते, याकडे मात्र कोणी लक्ष देत नाही. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी झाडलोट सर्वच ठिकाणी होते. परंतु, तो कचरा जाळून टाकण्यापलीकडे काहीच केले जात नाही. मात्र, येथील एचपीटी व आरवायके महाविद्यालयाने या बायोवेस्टच्या माध्यमातून कंपोस्ट खत प्रकल्प साकारून आदर्श समोर ठेवला आहे.


महाविद्यालयाच्या आवारात दिवसभर साठणारा झाडांचा पालापाचोळा, गार्डन कटिंग, लॉन कटिंग, कोमेजलेली फुले, पाने आदी गोष्टींचे मिर्शण करून त्यामध्ये बॅक्टेरिया आणि फंगस (बुरशी) यांचे कल्चर मिसळून आवारातच तयार केलेल्या हौदात हे सर्व एकत्र केले जाते. या माध्यमातून 75 दिवसांत उत्कृष्ट प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते. या ठिकाणी अत्यंत जुनी वडाची झाडे आहेत. त्यांच्या पानांचा सर्वाधिक समावेश या खतात असल्याने त्याची प्रतवारी उत्तम असते.
महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग आणि ‘कमवा व शिका’ विभागातर्फे या खत प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम मांडण्यात आली. त्यानुसार प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. चेतन जावळे आणि ‘कमवा व शिका’ विभागाचे प्रा. वसावे यांनी पुढाकार घेऊन यावर काम सुरू केले. या संपूर्ण प्रकल्पात ‘कमवा व शिका’ विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सक्रिय काम करतात. एकूण 124 विद्यार्थी सध्या यामध्ये काम करत आहेत. त्यापैकी निम्म्या मुली आहेत. यापैकी बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून, त्यांना येथे दिवसाला एक तास काम केल्यावर विद्यापीठ नियमानुसार 25 रुपये दिले जातात. साधारणपणे दिवसाला तीन तास काम करून हे विद्यार्थी ज्ञानार्जनासोबतच 75 रुपयांचे अर्थार्जनही करतात. कोणत्याही भांडवलाविना उत्तम दर्जाचे खत या प्रकल्पातून मिळत असल्याने नजीकच्या भविष्यात याची केवळ आठ रुपये किलो दराने विक्री करण्याचे विचाराधीन असल्याचे प्रा. चेतन जावळे यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून हे काम उभे राहात असल्याचे प्रा. वसावे म्हणाले.


अशी आहे पद्धती
सुक्या व ओल्या कचर्‍याचे एकावर एक थर लावले जातात. प्रत्येक थरात बॅक्टेरिया व फंगस यांच्या कल्चरचे मिर्शण टाकले जाते. दोन थरांमध्ये पाणी मारले जाते. शेवटी सुक्या कचर्‍याचा थर लावून पुन्हा पाणी मारले जाते. हवा खेळती राहण्यासाठी बाहेरून पाइप असतात. शेण शक्य नसल्यास फंगस कल्चरचा वापर होतो. 15 किलो सुक्या कचर्‍यामागे एक किलो ओला कचरा, असे प्रमाण असते. एक थर कुजण्यासाठी 15 दिवस लागतात.

वनस्पतीशास्त्र विभागाची भागतेय गरज
महाविद्यालयाच्या ‘बॉटनी’ अर्थातच वनस्पतीशास्त्र विभागाला त्यांच्या प्रकल्पांसाठी आता बाहेरून खत विकत घेण्याची गरज पडत नाही. त्यांची सर्व गरज या खत प्रकल्पातून भागत आहे.


बॅक्टेरिया कल्चरही येथेच करणे शक्य
सध्या या खतासाठी लागणारे बॅक्टेरिया व फंगसचे कल्चर बाहेरून 500 रुपयांना विकत घ्यावे लागते. मात्र, आपल्याच महाविद्यालयाच्या मायक्रो विभागातर्फे ते कल्चर तयार करण्याचा विचार आहे. तसे झाल्यास तो खर्चही वाचेल. मार्केटमध्ये 18 रुपये दराने मिळणारे कंपोस्ट खत आपण आठ रुपये दराने गरजूंना उपलब्ध करून देऊ शकतो. मात्र याबाबत प्रस्ताव विचाराधीन आहे. - प्रा. डॉ. चेतन जावळे, वनस्पतीशास्त्र विभाग