आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: कुणाचे फुलेल मुखकमल;इच्छुकांकडून मुंडे-खडसे यांच्याकडे मोर्चेबांधणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भाजप शहराध्यक्षपदाच्या बुधवारी होणार्‍या निवडणूकीत विद्यमान शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, माजी अध्यक्ष विजय साने व युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास फरांदे यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे. एकमत न झाल्यास ऐनवेळी नवीन चेहर्‍याला पक्षर्शेष्ठींकडून संधी दिली जाण्याची शक्यता पदाधिकार्‍यांकडून वर्तविली जात आहे. यंदा प्रथमच शहराध्यक्षपदासाठी मोठय़ा प्रमाणात इच्छुक आहेत. आठवडाभरापासून ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या गाठीभेटी घेत इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.

पक्षाची सत्ता राज्यातील ज्या महापालिकेत आहे, त्यापैकी एक नाशिक असल्याने येथील पक्ष संघटनेकडे पक्षर्शेष्ठींकडून विशेष लक्ष दिले जात आहे. यंदा शहराध्यक्षपदासाठी सावजींसह विजय साने, प्रा. सुहास फरांदे, शहर उपाध्यक्ष महेश हिरे, सरचिटणीस नितीन वानखेडे, सुनील केदार व सुनील आडके यांची नावे चर्चेत आहेत. इच्छुकांनी रा. स्व. संघाच्या पदाधिकार्‍यांमार्फत फिल्डींग लावल्याचे बोलले जात आहे.

नाशिकरोड मंडलाची निवडणुक स्थगित : नाशिकरोड मंडल अध्यक्षपद निवडणुकीत इच्छुकांमध्ये अखेरापर्यंत एकमत न झाल्याने मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी महेश हिरे यांनी ही निवडणूकच स्थगित केली.

भाजपची स्थिती
> महापालिकेत सलग 11 वर्षांपासून सत्तेत
> मनपात महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, सभागृहनेतेपदावर वर्णी
> यंदा 14 नगरसेवक, उपमहापौरपद ताब्यात
> सिडको-सातपूरमध्ये एकही नगरसेवक नाही
> विधानसभा निवडणुकीत तिसर्‍या स्थानावर
> निम्याहून अधिक नगरसेवक व्यक्तिगत कामांच्या जोरावर विजयी

पुढे काय?
सावजींसह फरांदे व साने अशी लढत रंगणार असली तरी एकमत न झाल्यास महेश हिरे, नितीन वानखेडे अथवा सुनील केदार यापैकी एकाची अध्यक्षपदावर वर्णी लागू शकते. प्रा. फरांदेंची वर्णी प्रदेश सरचिटणीसपदी लागणे शक्य असल्याने सानेंचे नाव निश्चित होण्याची चर्चा आहे. मात्र, फरांदेंनी पक्षर्शेष्ठींकडे जोर लावल्यास हे पद त्यांच्याकडे जाईल असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अध्यक्षपदाची पुन्हा संधी मिळावी
जनसंघापासून भाजपात सक्रिय असून, विविध पदांवर काम केले आहे. शहराध्यक्षपदाची संधी प्रथम मिळाली. या कार्यकाळात संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देत महापालिकेत सत्ता कायम ठेवण्यात यश आले. पक्षपातळीवर प्रत्येक निर्णयात सर्वांना सोबत घेऊन काम केल्याने पक्षाने पुन्हा अध्यक्षपदाची संधी द्यावी. लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष

आगामी निवडणूक बघता संधी हवी
पक्षस्थापनेपासून सक्रिय असून, इतर पक्षांतील कार्यक र्त्यांना पक्षात आणले. यापूर्वी दोनदा अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्षाला सत्ता प्राप्त करून देण्यात महत्त्वाची भूमिका आणि आगामी निवडणुका व इतर पक्षांच्या तुलनेत संघटनेत चैतन्य निर्माण करण्यासाठी अनुभवाच्या जोरावर इच्छुक आहे. विजय साने, माजी अध्यक्ष

मुंडे-खडसे यांची भूमिका महत्त्वाची
शहर व जिल्हाध्यक्षपद निवडणुकीत लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची भूमिका महत्त्वाची समजली जाते. या नेत्यांचा नाशिकशी कायम संपर्क असल्याने हे दोन नेते ठरवतील तोच अध्यक्ष होईल, असे उघडपणे बोलले जात आहे.

उमेदवारांची कारकीर्द
शहराध्यक्ष लक्ष्मक्ष सावजी हे महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत 1992 मध्ये विजयी होऊन नगरसेवक झाले. त्यानंतर सलग दोन वेळा पराभव व गेल्या निवडणुकीत पत्नीचा पराभव. 30 वर्षांपासून पक्षात सक्रिय असून, 2009 मध्ये शहराध्यक्षपदी निवड, तर विजय साने यांनी सलग तीन वेळा नगरसेवक, स्थायी सभापती, सभागृहनेते-विरोधी पक्षनेतेपद भूषविले. 1995 ते 98 आणि 2006 ते 2009 पर्यंत शहराध्यक्षपदी निवड, तर प्रा. सुहास फरांदे यांनी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद व नगरसेवकपद भूषविले असून, पदवीधर मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती.

आतापर्यंतचे अध्यक्ष
स्व. बंडोपंत जोशी स्थापनेपासून वेगवेगळ्या काळात तीन वेळा अध्यक्ष, विजय साने दोन वेळा तर स्व. गणपतराव काठे, बिरदीचंद नहार, माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर, उपमहापौर सतीश कुलकर्णी व सावजी यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.