आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपकडून महिलांचा पत्ता कट; शिवसेनेतील निष्ठावंतांची लाॅटरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महिला सबलीकरणाचे गुणगान करणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्वीकृत सदस्य नियुक्तीत जुन्याजाणत्या महिला पदाधिकाऱ्यांचा पत्ता कट करीत भाजपबराेबरच विशिष्ट पदाधिकाऱ्यांचे निष्ठावंत तसेच घराणेशाहीची परंपरा जाेपासल्याचे चित्र दिसून अाले. तुलनेत शिवसेनेने एक महिला पुरुष असा निकष लावताना निष्ठावंतांची वर्णी लावल्यामुळे भाजपच्या तुलनेत अस्वस्थता कमी असल्याचे दिसून अाले. 


महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्या तारखेपासून एक महिन्यात स्वीकृत सदस्य नियुक्ती करणे अपेक्षित अाहे. ताैलनिक संख्याबळानुसार काेणत्याचे पक्षाचे किती स्वीकृत सदस्य जाऊ शकतात याची माहिती अायुक्तांनी गटनेत्यांना देणे त्यानंतर गटनेत्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ही नावे नगरसचिवांमार्फत महासभेत महापाैरांना जाहीर करण्यासाठी देणे अशी प्रक्रिया अाहे. पालिका निवडणुकीचे निकाल २३ फेब्रुवारी राेजी लागल्यामुळे पुढील महिनाभरात नियुक्ती अपेक्षित हाेती, मात्र सत्ताधारी भाजपला इच्छुकांची माेठी संख्या, पदाधिकाऱ्यांची रस्सीखेच अन्य कारणांमुळे नावे देण्यास विलंब झाला. दुसरीकडे, शिवसेनेने घाेडेबाजार पदाधिकाऱ्यांच्या वशिलेबाजीचा अाराेप टाळण्यासाठी महिला पदाधिकारी अॅड. श्यामला दीक्षित अनेक वर्षांपासून पक्ष कार्यालयाची धुरा बघणाऱ्या सुनील गाेडसे या कार्यकर्त्याला संधी दिली. शिवसेनेने नावे दिल्यानंतर भाजपचे गुऱ्हाळ सुरू हाेते. अखेरीस साेमवारी भाजपतील सदस्यांची नावे अंतिम झाली. भाजपकडून अामदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे कट्टर समर्थक तसेच भाजपच्या नाशिकराेड मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बाजीराव भागवत, भाजपचे सरचिटणीस प्रशांत जाधव तर ज्येष्ठ पदाधिकारी विजय साने यांचे पुत्र तथा युवा माेर्चा अाघाडीचा शहराध्यक्ष अॅड. अजिंक्य साने यांची वर्णी लागली. तिन्ही पुरुष सदस्यांची नावे जाहीर झाल्यामुळे महिला सदस्यांची निराशा नाराजी लपून राहिली नाही. महापाैर रंजना भानसी यांच्याकडे अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे त्यांची मनधरणी करण्याची कसरत करावी लागली. 


‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हटल्या जाणाऱ्या भाजपत काँँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे घराणेशाही जाेपासली जात असल्याचे अाराेप हाेत हाेते. ही बाब थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडत भाजप अामदार देवयानी फरांदे यांनी घराणेशाहीला खतपाणी घालता निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली हाेती. त्यातूनच साने यांच्या नावाला फरांदे यांचा विराेध असल्याचा सूर व्यक्त हाेत हाेता. मात्र, सानेंनी पक्षाच्या दिल्लीपर्यंतच्या नेत्यांशी असलेल्या संबंधांतून ताकद लावल्यानंतर त्यांच्या पुत्राला चाल मिळाली. यानिमित्ताने महिला रुग्णालयाच्या प्रकरणात विजयी ठरलेल्या फरांदेंना स्वीकृत निवडीत मात्र झटका बसल्याचे चित्र अाहे. दुसरीकडे, घराणेशाहीच्या मुद्यावरून भाजपतील जुनेे पदाधिकारी खासकरून महिला पदाधिकारी चांगल्याच नाराज झाल्या अाहेत. 


अनधिकृत धार्मिकस्थळासाठी सभा तहकूब 
अानंदाेत्सवासाठी सभा तहकूब केली असे जाहीर केले असले तरी, अनधिकृत धार्मिकस्थळ नियमित करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावासाठी प्रभारी अायुक्तांची उपस्थिती गरजेची अाहे. त्यामुळे महासभा तहकूब केली. अन्य काेणतेही कारण नव्हते. 
- रंजना भानसी, महापाैर. 


घराणेशाहीमुळे काम करण्याची इच्छा संपली 
प्रतिकूल काळात काम करणारे कार्यकर्ते केवळ सतरंज्या उचलण्यापुरतेच अाहेत का? महिला अारक्षणाची भाषा करणारे स्वीकृत निवडीत महिलांना कसे विसरले? अनेक वर्षांपासून पक्षात काम करताना अार्थिक परिस्थितीमुळे निवडणूक लढवता अाली नाही. पक्षाकडून कधीतरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा असताना घराणेशाहीचा पुरस्कार झाला. यापुढे भाजप कार्यालयात पाय ठेवण्याचीही इच्छा राहिलेली नाही. 
- सुजाता करजगीकर, पदाधिकारी, महिला अाघाडी, भाजप 


स्वीकृत निवडीच्या जल्लाेषासाठी पायंडा माेडत भाजपकडून महासभेवर पाणी 
शहरातील पाचशेहून अधिक अनधिकृत धार्मिकस्थळे नियमित करण्यासह काेट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव असलेली महासभा महापालिकेतील सत्ताधारी भाजपने निव्वळ अाठ महिन्यांनंतर पाच स्वीकृत सदस्य नियुक्ती झाल्यामुळे पक्षाकडून हाेणाऱ्या जल्लाेषाच्या कारणासाठी तहकूब करण्यात अाली. मनसेच्या काळात महापालिकेतील दिवंगत सदस्याचे निधन किंवा राष्ट्रीय दुखवट्याशिवाय अन्य कारणासाठी सभा तहकूब करण्याचा काैतुकास्पद पायंडाही भाजपने माेडीत काढत मंगळवारी दुपारी महासभेचे कामकाज करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र विवाह समारंभाचे कारण देत विराेधी पक्षाने त्यास विराेध सुरू केला अाहे. 


विराेधकांना विवाहात स्वारस्य; महापाैरचा निग्रह कायम 
नाशिककरांनी भाजपला स्पष्ट बहुमताद्वारे महापालिकेची सत्ता दिली अाहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत भाजपचा कारभार अत्यंत वादात असून सभा गुंडाळणे, जादा विषयात काेट्यवधी रुपयांचे विषय मंजूर करणे असे अाराेप त्यांच्यावर हाेत अाहे. विशेष म्हणजे, शिवसेनेकडून कट्टर विराेधी पक्ष म्हणून भाजपला विराेध हाेत असला तरीही दाेन्ही पक्षांची मिलीजुली असल्याचे अाराेप याच पक्षातील नेत्यांनी अापसी भांडणातून केल्यामुळे पालिकेत काेणाचाच काेणाला पायपाेस नसल्याचे चित्र अाहे. त्याची प्रचिती साेमवारी झालेल्या महासभेत दिसून अाली. महापालिका निवडणुकीनंतर अाठ महिन्यांनी पाच स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी गटनेत्यांनी नावे दिल्यामुळे केवळ त्याची घाेषणा करण्याची घाई भाजपकडून दाखवली गेली. उर्वरित विषय महासभेच्या पटलावर दाखल करून घेत महापाैर रंजना भानसी यांनी मंगळवारी दुपारी सभा घेण्याचे घाेषित केले. त्यास राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी विराेध सुरू करताच महापाैरांनी राष्ट्रगीताची घाेषणा केली. त्यामुळे महासभेचे कामकाज संपवले गेले. 


साेमवारी महासभा तहकूब करण्याच्या निर्णयाविराेधात प्रबळ विराेधक असलेल्या शिवसेनेसह अन्य विराेधकांनी नांगी टाकली. महापाैरांनी दुसऱ्या दिवशी सभा घेण्याचे जाहीर केल्यानंतर मात्र विराेधी पक्षांनी भाजप गटनेते संभाजी माेरूस्कर, सभागृहनेते दिनकर पाटील यांच्याकडे तक्रारीचा पाढा सुरू केला. माजी महापाैर अशाेक मुर्तडक यांनी अशा पद्धतीने महासभा संपवायची हाेती तर तसा निराेप का दिला नाही, असा टाेला लगावला. दरम्यान, तहकूब सभा कधी घ्यायची यावरून जाेरदार खल झाला. उपमहापाैर प्रथमेश गिते यांच्या विवाहानिमित्त भाजपचे बडे नेते नाशिकला येणार असल्यामुळे २५ २६ नाेव्हेंबर राेजी बैठक घेऊ नका, असे माेरूस्कर यांनी सांगितले. २७ नाेव्हेंबर राेजी शिवसेना युवानेते अादित्य ठाकरे नाशिक दाैऱ्यावर असल्यामुळे ताे मुहूर्त अजय बाेरस्ते यांनी नाकारला. अखेर २४ नाेव्हेंबर राेजी सकाळी थाेडक्यात महासभा अाटाेपून घेऊ, असे उभयंतांच्या बैठकीत ठरले. दरम्यान, यासंदर्भात माेरूस्कर यांनी महापाैरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी घाेषणा केल्याप्रमाणे मंगळवारी दुपारी कामकाज हाेणारच, असे स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...