आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात गुरुवारी धरणे आंदोलन सुरू असतानाच पक्षाचे माजी नगरसेवक शरद सानप यांना मंडपात बघताच शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी त्यास विचारणा केल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन चांगलीच जुंपली. या वादात सानप यांनी शहराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत तोंडसुख घेतले. पक्षाच्या पदाधिकार्यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने वाद संपुष्टात आला.
भाजप शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांचा गट सक्रिय झाल्याची चर्चा सुरू असतानाच हा वाद झाल्याने त्यात आणखी भर पडली आहे. बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना शरद सानप यांनी मंडपात बसलेल्या प्रा. सुहास फरांदे, सुनील केदार यांच्यासह अन्य पक्षनेत्यांच्या भेटी घेतल्या. सावजी यांनी इकडे कसा आलास? असे विचारताच सानप यांनी सावजी यांना शिवीगाळ करीत पक्ष कोणाच्या घरची मालमत्ता नसून आपणही पक्षात अनेक पदे भूषविली आहेत. तुम्हीच खरेतर पक्षाला रसातळाला नेले असून, विरोधकांकडून पैसे खाल्ल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्ष वाढविण्याऐवजी केवळ स्वार्थच साधल्याची टीका त्यांनी केली.
याबाबत भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या वादाचा आणि शहराध्यक्षपद निवडणुकीचा कुठलाही संबंध नाही. बंडखोर सानप याने आंदोलनाच्या वेळी रस्त्यावरून काहीतरी बडबड केल्याचे दिसले. पण अशा वायफळ बडबडीकडे आपण दुर्लक्ष केले. राष्ट्रीय विषयावर आंदोलन सुरू असताना अशा किरकोळ बाबींकडे लक्ष कशाला द्यायचे. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली, त्यात त्यांचा पराभव झाला असून, त्यांनी निष्ठेविषयी बोलू नये, असेही सावजी म्हणाले.
नाराजांना दूर ठेवले
या वादाबाबत पक्षाच्या पदाधिकार्यांनी शहराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरच नाराजी व्यक्त केली. पक्षातून बंडखोरी केली असली तरी सानप पक्षाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले असता अथवा कोणाला भेटायला आले असतील त्यांना अशाप्रकारे विचारणा करणे योग्य नाही. याउलट त्यांची आस्थेने चौकशी केली असता त्यांची नाराजी दूर होऊन ते पक्षातदेखील पुन्हा सक्रिय होऊ शकतात. मात्र, या प्रकाराने नाराजांना जवळ आणण्यापेक्षा दूर ठेवण्याचाच हा प्रकार असल्याचेही सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.