आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुभाषचंद्र बोसनंतर उघडणार आता सावरकरांच्या फाइल्स- डॉ. सुब्रमण्यम स्वामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतच्या फाइल्स उघडल्या जाव्यात याकरिता मी काम करणार आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला, छळाला जबाबदार कोण याबाबतची सगळी तथ्ये त्यातून समोर येतील. मात्र, त्यासाठी अजून दोन वर्षे वाट पाहावी लागेल,’ असे प्रतिपादन भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी केले.

नाशिकमध्ये आयोजित ‘भारत : काल, आज आणि उद्या’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. ‘अमेरिका आणि इंग्लंडमध्ये छापलेल्या साक्षीदारांच्या अहवालानुसार, महात्मा गांधींच्या शरीरात चार गोळ्या होत्या. खुनाच्या सुनावणीमध्ये सरकारी वकिलांनी तीन गाेळ्या सांगितल्या, तर नथुराम गोडसेने दोनपेक्षा जास्त गोळ्या चालवणार नाही, असा संकल्प करून आल्याचे सांगितले होते. मग हा फरक पडला तरी कसा? कोणाच्या सांगण्यावरून गांधीचे शवविच्छेदन झाले नाही. त्यामागे माेठी मिस्ट्री अाहे. या फाइल्स उघडल्यावर ती समाेर येऊ शकेल,’ याकडे स्वामींनी लक्ष वेधले.
या वर्षातच अयाेध्येत राममंदिराच्या कामाला सुरुवात हाेईल अाणि त्यानंतर काश्मीरसाठी घटनेतील कलम ३७० ही रद्द हाेईल, पण त्याकरिता केवळ कॅबिनेटने राष्ट्रपतींना पत्र देण्याची गरज असल्याकडे स्वामी यांनी लक्ष वेधले.
माेदींकडे जेटलींचे चालते, माझे नाही : सोनिया अाणि राहुल गांधी यांच्या विदेशातील बँक खात्यांमधील पैशाची सर्व माहिती इंटेलिजन्स ब्युरोकडे आहे. विदेशातील हे काळे धन परत आणण्यासाठी या बँक खात्यांवर टाच आणून त्यातील पैसा परत आणण्याबाबतची मागणीवजा माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण दिली होती. मात्र, मोदींनी अर्थमंत्री अरुण जेटलींकडे हा प्रश्न सोपवला. अशी कारवाई केल्यास हाेऊ शकणारे सामाजिक प्रश्न, वादविवाद लक्षात घेता जेटलींनी पावले उचलली नाहीत. ‘माेदी के पास जेटली की चलती है, मेरी नहीं’ अशी खंतच स्वामी यांनी व्यक्त केली.
सावरकरांचे नाव नेहरुंमुळे गाेवले
जवाहरलाल नेहरू यांच्या सांगण्यावरूनच सावरकरांचे नाव गांधी हत्येशी जोडण्यात आले. मात्र, गांधी हत्येशी सावरकरांचा काहीच संबंध नसल्याचे पुढे स्पष्ट झाले. यामुळेच सावरकरांच्या बदनामीची लाज वाटून इंदिरा गांधींनी त्यांच्यावर तिकीटही काढले.
काँग्रेसकडून गाडी अडवण्याचा प्रयत्न
नाशिकमधील कार्यक्रम अाटाेपून जात असलेल्या डाॅ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या वाहनांचा ताफा काँग्रेस कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. कार्यालयासमाेरच या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत स्वामी यांच्या निषेधाच्या घाेषणाही िदल्या.
गांधी हत्येचा फायदा जवाहरलाल नेहरूंना
पंतप्रधानपदाकरिता महात्मा गांधींनी बाेलावलेल्या काँग्रेस प्रतिनिधींपैकी केवळ एकानेच नेहरूंचे नाव घेतले. बाकीच्या चाैदांनी सरदार पटेलांचे नाव घेतले. महात्मा गांधी मात्र दु:खी झाले. त्यांनी नेहरू अाणि पटेल यांच्यात काँग्रेस वाटायची अाणि स्वातंत्र्य आंदोलनातील काँग्रेस समाप्त करायची असा निर्णय घेतला. मात्र, त्यापूर्वीच त्यांची हत्या झाली. गांधींच्या हत्येचा सगळ्यात जास्त फायदा नेहरूंना झाला,’ असा आरोपही डॉ. स्वामींनी केला.