आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावजी-फरांदेंमध्ये पक्षीय बैठकीत ‘तू तू-मैं मैं’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महासभेच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी झालेल्या भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी आणि माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका देवयानी फरांदे यांच्यामध्ये ‘तू तू-मैं मैं’ झाली. उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी मध्यस्थी करून या वादावर पडदा टाकला. वादानंतर लगेचच चहापान होऊन पुन्हा गोडवाही निर्माण झाला. जणू काही झालेच नाही याप्रमाणे पुन्हा पार्टी मीटिंग रंगात आली.

बुधवारी तहकूब महासभा असल्याने मंगळवारी सर्वच पक्षांच्या बैठका झाल्या. त्यानुसार, भाजपचे उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्या दालनात सायंकाळी भाजपच्या बैठकीत महासभेवरील विषयपत्रिकेवर चर्चा सुरू असतानाच नगरसेविका देवयानी फरांदे यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांना उद्देशून पक्षाचे पदाधिकारी नगरसेवकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप केला. त्यावर सावजी यांनीही फरांदे यांना तुम्ही उगाचच आरोप करून पक्षाचे वातावरण खराब करत असल्याचे सांगून, अशा स्वरूपाचे आरोप अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला. जवळपास पंधरा मिनिटे हा वाद सुरू होता असे तेथील काही प्रत्यक्षदर्शी नगरसेवकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

सभापतिपदावरून वाद : महिला व बालकल्याण समिती सभापती भाजपच्या सविता दलवाणी या आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या सभापतिपदाच्या या निवडणुकीत पदाधिकार्‍यांनी नगरसेवकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याची बाब फरांदे यांनी पक्षाच्या बैठकीत उघड केली. या कारणावरूनच वाद सुरू झाला. त्यावर सावजी यांनी यासंदर्भात निवडणुकीवेळी केवळ शेवटच्या पाच मिनिटांत शिवसेनेशी बोलणी होऊन निर्णय घेतला गेल्याचे सांगितले.

काहीच नाही; पक्षांतर्गत वाद
यासंदर्भात फरांदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बैठकीत काहीही घडले नाही, अशी भूमिका घेतली, तर शहराध्यक्ष सावजी यांनी पक्षांतर्गत एखाद्या मुद्यावरून किरकोळ वाद होतातच. त्याला फारसे महत्त्व देऊ नये, असे स्पष्ट केले.