नाशिक- माजी आमदार तथा मनसे नेते वसंत गिते यांना भाजपमध्ये घेण्यावरून आता पक्षांतर्गत सुंदोपसुंदी सुरू झाली असून, नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या गटाकडून विरोध सुरू झाला आहे. दुसरीकडे मात्र गिते यांचे निकटवर्तीय असलेले प्रदेश सदस्य विजय साने यांनी त्यासाठी जोर लावला आहे.
दोन दिवसांपूर्वी प्रदेश सदस्य विजय साने यांनी गिते
आपल्या संपर्कात असल्याचे जाहीर केले होते. दुसरीकडे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी हे मात्र या प्रक्रियेपासून दूर होते. त्यांनी कोणी पक्षात येत असेल तर स्वागत असे सांगत आपल्याशी संपर्क नसल्याचेही स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सर्वप्रथम भाजपकडून प्रदेश सदस्य विजय साने व आमदार बाळासाहेब सानप यांनी गिते यांची भेट घेत त्यांना पक्ष प्रवेशाचे आवतण दिले. विधानसभा निवडणुकीपूर्वीही गिते हे भाजपच्या वाटेवर होते व त्यांचा संपर्क अद्याप तुटला नाही, असे साने यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. तोच धागा पकडून त्यांनी पक्षात प्रवेश केल्यास भविष्यात चांगली जबाबदारी देण्यात येईल असे त्यांनी सुचवले. दुसरीकडे या हालचाली बघता देवयानी फरांदे यांनी गिते व समर्थकांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. यापूर्वी फरांदे व गिते यांच्यात राजकीय वादातून चांगलेच भांडण रंगले होते. अगदी तोडफोडीपर्यंत हे प्रकरण गेले होते. त्यातच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावरील प्रतिस्पर्धी राहिलेल्या वसंत गिते यांना पक्षात घेण्यास फरांदे गटाने तीव्र विरोध दर्शवल्याचे समजते. खुद्द फरांदे यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून अद्याप माझ्या अंगावरचा विजयाचा गुलाल गेला नाही, तोच प्रतिस्पर्धी उमेदवाराला मनसेतून भाजपात आणले जात असल्याच्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे िगते यांचा प्रवेश साने यांनी प्रतिष्ठेचा केल्याचे समजते. नाशिक मर्चंट बँकेतील संचालक मंडळात सहकारी असलेले गिते हे साने यांचे जवळचे मित्र असल्याचे सर्वश्रृत आहे.
नगरसेवकांमधूनही नकारघंटा : फरांदे यांना भेटून भाजपातील काही नगरसेवक तसेच इच्छुकांनी गिते यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवल्याचे समजते. मनसेचे नगरसेवक गिते यांच्यासोबत आल्यास पुढील निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळण्यात अडचणी निर्माण होतील. भाजपची लाट असल्यामुळे आता जुन्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी, अशी मागणी पुढे आली आहे.
घाई कशासाठी?
नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी बाकी आहे. नव्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर झालेला नाही. अशा स्थितीत प्रतिस्पर्धी पक्षातील उमेदवाराला पक्षात आणण्याची घाई कशासाठी? दोन वर्षे कोणत्याही िनवडणुका नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य व्यक्तीला पक्षात आणण्याबाबत भूमिका घेतली जाईल. त्यासाठी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्यासमवेत चर्चा करून निर्णय घेऊ. देवयानी फरांदे, आमदार, भाजप