आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- धनंजय गाडगीळ यांनी सुरू केलेल्या सहकार चळवळीची गुणवत्ता घटल्यामुळे तिची अधोगती झाल्याची खंत व्यक्त करत हुकूमचंद बागमार यांच्यासारखे दूरदर्शी नेतृत्व लाभल्यास या चळवळीला नवसंजीवनी मिळेल, असे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले.
नामको बॅँकेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन व बागमार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गडकरी म्हणाले की, देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. विकासदर नऊ टक्क्यांपर्यंत जाण्याऐवजी 5 टक्क्यांवर आला आहे. परदेशी गुंतवणूक ठप्प झाली आहे. डॉलरची किंमत 58 रुपये झाली आहे. जागतिक अर्थकारणात भारत व चीनची स्पर्धा होण्याची आशाही निष्फळ ठरली आहे. त्यातच सहकाराचीही अधोगती होत असून कारभार्यांना नेमके कॅपिटल काय याचीच माहिती नाही. अमेरिकेतील एका चर्चासत्राचा संदर्भ देत खरे कॅपिटल हे विश्वसनीयता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बागमार व सहकारी संचालकांच्या बाबत हेच कॅपिटल महत्त्वाचे असल्यामुळे सभासदांनी विश्वास ठेवून नामकोला साथ दिल्याचेही गडकरी म्हणाले. नफ्याचा उपयोग सामाजिक उपक्रमासाठी केल्यामुळे नामकोचे त्यांनी कौतुक केले. सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे दिसत असले तरी, आजही काही चांगले लोक टिकून आहेत. त्यामुळे स्पर्धा व आव्हानाचा स्वीकार करून बॅँकांनी स्वत:चा पाया मजबूत करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, महापौर यतिन वाघ, अ. भा. श्वेतांबर जैन संघाचे अध्यक्ष अविनाश चोरडिया, भालचंद्र खरवड, खासदार हरिश्चंद्र चव्हाण व प्रतापदादा सोनवणे, आमदार वसंत गिते, अँड. उत्तमराव ढिकले, नितीन भोसले व अनिल कदम, तसेच अतुल चांडक, समीर शेटे, विजय साने, प्रकाश दायमा आदी उपस्थित होते.
...तर जीवनात यश हमखास : बागमार
आयुष्यातील प्रत्येक संधीचा फायदा हुशारीने घेतला तर यश सहज मिळते, असे सांगतानाच नामकोच्या यशाचा प्रवासही बागमार यांनी उलगडून दाखवला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, 1975 मध्ये छोट्या व्यापार्यांनी मिळून नाशिक र्मचंट बॅँकेची स्थापना केली तेव्हा प्रचंड संघर्ष करावा लागला. मात्र, निराश न होता वाटचाल करीत आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करून सभासदांचा आर्थिक विकास केला. प्रगती करताना सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केल्यामुळेच नामकोने भरारी घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.