आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-शिवसेना युतीत विधानसभेवरून वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/नाशिकरोड- लोकसभा निवडणुकीत झालेल्या हार-जीतच्या आधारावर अनेक वर्षांपासून असलेल्या युतीमध्ये विधानसभेच्या जागेवरून वादाची ठिणगी पडली आहे, तर दुसरीकडे महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून युती असलेल्या भाजप-मनसेच्या नेत्यांमध्ये वक्तव्यामुळे दुरावा निर्माण होऊन युतीच अडचणीत सापडली आहे. या भांडणाचा फायदा कॉँग्रेस आघाडीकडून उचलला जाणार असल्याने राजकीय वतरुळात या घडामोडींची चर्चा झडत आहेत.
पालिका निवडणुकीत मनसेव्यतिरिक्त शिवसेना, भाजप, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसला मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले होते. युतीतील भाजपने मनसेशी संधान साधत पालिकेतील सत्तेचा वाटा आपल्या पदरात पाडून घेतला होता. यामुळे नाशिकपुरते का होईना शिवसेनेला एकाकी राहावे लागले होते. मात्र, आता लोकसभा निवडणुकीत युतीच्या दोन्ही मित्र पक्षांना मोदी लाटेचा फायदा मिळाल्याने सध्या हे दोन्ही पक्ष इतरांवर शिरजोरी करू लागले असून आता दोन्ही पक्षांतील नेतेमंडळीतही वादाची ठिणगी पडू लागली आहे. भाजपने शहरातील विधानसभेच्या सर्व चार जागांवर हक्क सांगितला आहे. जी जागा सलग चार निवडणुकीत शिवसेना जिंकत आली त्या देवळाली मतदारसंघावरही भाजप हक्क सांगू लागला आहे. विधानसभेच्या तीन जागा मनसेकडे आहे. मात्र, लोकसभेतील पडझड पाहता आगामी विधानसभेत पक्षाला बरीच मेहनत करावी लागणार आहे.

घोलप पुत्राचे लाँचिंग : वडनेर येथे वाढदिवसाचे निमित्त साधत आमदार बबनराव घोलप यांनी शिवसैनिकांचा मेळावा घेऊन पुत्र योगेशचे लाँचिंग केले. भ्रष्टाचार प्रकरणीच्या शिक्षेला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न घोलपांकडून सुरू आहेत. त्यात यश न आल्यास पुत्राला ते मैदानात उतरवतील.