आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने ठेवले दोन थडींवर हात; मनसेला नवा डाव खेळण्याची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मनसेसोबत तुटलेली युती लक्षात घेत शिवसेनेने महापौरपदासाठी बाह्या सरसावल्या असताना, भाजपने दोन्ही थडींवर हात ठेवत जो महापौरपदासाठी पाठिंबा देईल त्यासोबत जाण्याची तयारी चालवली आहे. उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी तसे संकेत दिल्यामुळे मनसेला नवीन चाल खेळण्याची संधी मिळणार आहे.
राज्यस्तरीय युती तोडत नाशिक महापालिकेत भाजपने मनसेसोबत घरोबा केला होता. मात्र, अडीच वर्षांतच उभयतांच्या संबंधांमध्ये वितुष्ट आले. स्थायीच्या सभापतिपदासाठी भाजपचा दावा असताना, अंतर्गत गटबाजीतून मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिले यांचे नाव पुढे केले गेले. ढिले यांनी माघार न घेण्याचा निर्ण य घेत जुळवाजुळव करीत सभापतिपद मिळवले. यात भाजपने सेनेसोबत पुन्हा युती करीत उमेदवार दिला. मात्र, अपक्षांच्या मदतीने मनसेने बाजी मारली. या निवडणुकीनंतर भाजपच्या नेत्यांनी मनसेसोबतचे संबंध तुटल्याचे जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यस्तरावरील शिवसेना- भाजप युती तसेच मनसेला लागलेली घरघर लक्षात घेता पालिकेतही जुन्या मित्रांसोबत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या. यात भाजपला गृहीत धरून सेनेच्या काही नेत्यांनी संख्याबळही जुळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या पार्श्वभूमीवर संख्याबळ कमी असले तरी भाजपलाही कोणीही गृहीत धरू नये, असा संदेश देण्याची तयारी चालवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसे वा शिवसेनेला पालिकेत सत्ता हवी असेल तर त्यांनी भाजपला महापौरपद द्यावे, अशी मागणी केली जाणार असल्याचे समजते.
भाजपकडून हे आहेत इच्छुक
महापौरपदासाठी भाजपकडून देवयानी फरांदे, सीमा हिरे, दिनकर पाटील, संभाजी मोरुस्कर, दामोधर मानकर, बाळासाहेब सानप व डॉ. राहुल आहेर हे इच्छुक आहेत. महापौरपदासाठी शिवसेनेतही जुळवाजुळव सुरू झाली आहे. महापौरपद मिळविण्यासाठी शिवसेनेतील इच्छुकांची जोरदार तयारी सुरू असून, विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर महापौरपदासाठी शिवसेना कशी समीकरणे जुळवणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहीले आहे.
महापौरपदासाठी भाजपचा दावा
केंद्रात भाजपची सत्ता असून, राज्यातही भाजपचीच सत्ता येईल, असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतही भाजपला महापौरपदाच्या रूपाने सत्ता मिळवणे शक्य आहे. दोन्ही पक्षांचे पर्याय खुले असून जे पाठिंबा देतील त्यांच्या मदतीने सत्ता स्थापन केली जाईल.
सतीश कुलकर्णी, उपमहापौर
मनसेसाठी सेना राज्यस्तरावर अनुकूल
भाजपची युती असून, स्थायीच्या निमित्ताने आता पुन्हा जुने मित्र एकत्र होण्याची तयारी करीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीत राज ठाकरे हे व्यस्त असल्यामुळे तसेच स्थानिक पातळीवर गटबाजी शमत नसल्यामुळे महापौरपद मिळवण्यासाठी ते फार रस घेतील, असे दिसत नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर भाजपला महापौरपद देऊन सत्ता कायम ठेवली तर एकाच दगडात दोन पक्षी मारता येतील. त्यातून शिवसेना व भाजपचे संबंध बिघडतील व दुसरीकडे सत्तेतील भागीदारी कायम ठेवता येईल.