आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समिती सभापतिपदाची माळ शिवाजी गांगुर्डेंच्या गळ्यात; स्पष्ट बहुमतामुळे भाजपची सरशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्थायी समिती सभापतींची औपचारिक मानली जाणारी निवडणूक अपेक्षेप्रमाणे शांततेत पार पडत ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडली. शिवसेनेसह विरोधकांनी एकत्रित बोट बांधत भाजपला झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र स्पष्ट बहुमतामुळे भाजपचीच सरशी झाली.
 
स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक आरंभापासून चर्चेत होती. भाजपला ६६ इतक्या जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी चार अपक्षांना प्रत्येकी एक याप्रमाणे गळाला लावून गटनोंदणीद्वारे स्थायीच्या १६ पैकी आठ जागा मिळवण्याचा प्रयत्न विरोधकांचा होता. तसे झाले तर भाजपचे आठ विरोधकांचे आठ असे समान संख्याबळ होऊन स्थायी समितीच्या चाव्या सत्ताधारी भाजपकडून जातील असे चित्र होते. मात्र, शिवसेनेने यापूर्वीच गटनोंदणी केल्यामुळे रिपाइंच्या दीक्षा लोंढे यांना गटात घेता येणार नाही, असा निर्णय विभागीय आयुक्तांनी दिला. त्यामुळे तौलनिक संख्याबळाचा विचार केला तर अपूर्णांक शिवसेनेपेक्षा अधिक असल्यामुळे उतरत्या क्रमांकाने एक जागा भाजपच्या पारड्यात गेली.

त्याविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र न्यायप्रविष्ट प्रकरण असताना महापौर रंजना भानसी यांनी स्थायी सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे भाजपकडे नऊ इतके स्पष्ट बहुमत आले. त्याचा परिणाम म्हणून शुक्रवारी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, राष्ट्रीय काँग्रेस यांनी मतदान केले, मात्र भाजपच्या शिवाजी गांगुर्डे यांना नऊ तर विरोधी महाआघाडीतील शिवसेनेचे उमेदवार डी. जी. सूर्यवंशी यांना सात मते पडल्यामुळे सभापतिपदाची माळ गांगुर्डे यांच्या गळ्यात पडली.
 
..अन् चुकला काळजाचा ठोका : नुकतीचमहापालिका निवडणूक झाल्यामुळे अनेक नगरसेवकांची चेहरेपट्टी प्रशासनाला माहीत नाही. अशात स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत हजर सदस्यांची नावे मोजता मोजता अचानक १७ सदस्यांची संख्या भरली. बघितले तर शिवसेनेसह विरोधकांची सदस्यसंख्या आठ इतकी झाली होती. मग नावानुसार मोजणी झाल्यावर संगीता जाधव या शिवसेनेच्या नगरसेविकेने चुकून हजेरी लावल्याचे उघड झाले.
 
निवडीपूर्वीच भाजपेयींचा शिरकाव
सभापतिपदाचीनिवडणूक औपचारिक असली तरी निवड होण्यापूर्वी भाजप आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विजय साने आदींसह पदाधिकारी नगरसेवकांनी सभागृहात शिरकाव केला. विशेष म्हणजे, त्यावर विरोधकांनी हरकत घेतली नाही, ना निवडणूक निर्णय अधिकारी ज्योतिबा पाटील यांनीही विचारणा केली.
 
शशिकांत जाधव यांची पुन्हा निराशा
मनसेतअसताना महापौरपदाचे दोन्ही वेळेस दावेदार राहिलेल्या शशिकांत जाधव यांची निराशा लपून राहिली नाही. मनसेत सभागृहनेते वगळता अन्य मोठे पद मिळाले नाही. भाजपात गेल्यानंतर स्थायी समिती सभापतिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात गांगुर्डे यांची वर्णी लागल्यामुळे त्यांना पुन्हा धक्का बसला.
 
पारदर्शी कारभार करू
सर्वांना विश्वासात घेऊन वेगळ्या पद्धतीने स्थायी समितीचे कामकाज केले जाईल. पारदर्शी कारभार हाच प्रमुख मुद्दा असणार असून, आदर्श कामकाज करून दाखवणार. -शिवाजी गांगुर्डे, सभापती, स्थायी समिती
 
बातम्या आणखी आहेत...