आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या लोकप्रतिनिधींची बांधिलकी तर पक्षाशीच, पाणीप्रश्नावर आमदारांचे अक्षम्य मौन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘अच्छेदिन आयेंगे’चा आशावाद मनी बाळगत ज्या नाशिककरांनी भारतीय जनता पक्षाच्या ओंजळीत भरभरून मतांचा जोगवा दिला, किंबहुना शहरातील तिन्ही जागांवर भाजपचेच आमदार निवडून दिले, त्याच नाशिककरांकडे पाण्यासारख्या संवेदनशील प्रश्नाच्या बाबतीत या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे. केवळ राज्य शासनाच्या भूमिकांची पालखी उचलणाऱ्या या लोकप्रतिनिधींना नाशिककर रयतेची चिंताच नसल्याची बाब यानिमित्ताने ठळकपणे अधोरेखित झाली आहे. त्यामुळे आगामी काळात याच भाजपच्या मंडळींचे नाशिककरांनी ‘पाणि’पत केल्यास नवल.

शहरातील रयतेची तृष्णा भागविण्यास्तव स्वातंत्र्यपूर्व काळात गंगापूर धरण बांधले खरे, मात्र त्यावर मालकी हक्क असल्याच्या आविर्भावात शासनातील काही मुखंडांनी जायकवाडीसाठी पाणी सोडले. त्यामुळे नाशिककरांच्या मूलभूत हक्कावरच पाणी फेरले गेले. जायकवाडीला पाणी देणे गैर आहे, असे म्हणता येत नसले तरीही मुळात प्रथम नाशिककरांची तहान भागवून मग मराठवाड्याचा विचार करणे ही बाब प्रशस्त ठरली असती. नाशिककरांसाठी जितक्या पाण्याचे आरक्षण आहे, तितके पाणीदेखील गंगापूर धरणात नसल्याने पाणीकपातीचा वरवंटा काही महिन्यांपूर्वीच फिरविण्यात आला आहे.
सहनशील नाशिककरांनी समजुतीची भूमिका घेत या निर्णयाचाही स्वीकार केला. तत्राप याच समजुतीच्या भूमिकेचा गैरफायदा घेत राज्यकर्त्यांनी नाशिककरांच्या हक्काचे पाणी जायकवाडीसाठी सोडले आहे. त्यामुळे आगामी काळात दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा होण्याचे गडद संकट ओढवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींनी हतबल असलेल्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असताना, प्रत्यक्षात भाजपच्या आमदारांनी या प्रश्नी मौन बाळगले आहे. राज्य शासनाने एक भूमिका घेतली म्हणून तिच्याविरोधात आवाजच उठवायचा नाही, अशा संकुचित मानसिकतेतून भाजपेयींनी नाशिककरांना चक्क वाऱ्यावर सोडून दिले आहे. यातील पश्चिम मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे यांनी किमानपक्षी पाणी सोडण्याच्या निर्णयाला शाब्दिक विरोध तरी दर्शविला. मात्र, उर्वरित दोन्ही आमदार या प्रश्नावर रस्त्यावर उतरायला तयार नाहीत, ना त्यावर भाष्य करायला. दुसरीकडे ज्यांच्या शिरावर जिल्ह्याचे पालकत्व आहे, त्या पालकमंत्र्यांनीही सध्या ‘नरो वा कुंजरो वा’ची भूमिका घेऊन नाशिककरांना ‘बेवारस’ केले आहे. त्यामुळे आगामी काळात कुठल्या ‘हवेला’ वा ‘लाटेला’ बळी पडावे का, याचे उत्तर नाशिककरांनी आताच शोधून ठेवले तर नवल नसावे.