आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काळ्याचे पांढरे’ करण्याचा धंदा तेजीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाचशे अाणि हजाराच्या नाेटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मंगळवारी रात्री अचानक घेतला. त्यामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांना दरदरून घाम फुटला. अशा मंडळींना अापल्याजवळ असलेल्या ५०० अाणि १००० रुपयांच्या नाेटांचे काय करायचे अाणि हा पैसा कसा ‘व्हाइट’ करायचा, यासाठी प्रयत्न सुरू केले अाहेत. यापूर्वी काळ्या पैशाविषयी चर्चा सुरू होत हाेती तेव्हा काळा पैसा म्हणजे ‘भारतातल्या काही लोकांनी परदेशी बँकांत नेऊन ठेवलेला पैसा’, असे मानले जात हाेते. परंतु काळा पैसा म्हणजे केवळ तोच पैसा नव्हे, तर कर चुकवून देशातल्या देशात वापरला जाणारा पैसा म्हणजेसुद्धा काळा पैसाच असतो. त्याला आपल्या व्यवहारी भाषेत नंबर दोनचा पैसा असे म्हटले जाते. म्हणजे ज्या पैशातून होणाऱ्या व्यवहारावर सरकारला कसलाही कर मिळत नाही आणि ज्या पैशातून होणारे व्यवहार कधीही कागदावर येत नाहीत तो म्हणजे काळा पैसा. असा पैसा ठिकठिकाणी लपवून ठेवण्यात ही मंडळी धन्यता मानते. माेदी सरकारने त्यावर अाळा घालण्यासाठी थेट ५०० अाणि १००० रुपयांच्या नाेटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अाता काळा पैसा वा दाेन नंबरचा पैसा िनयमित करण्यासाठीच्या हालचाली युद्धपातळीवर सुरू झाल्या अाहेत. डी. बी. स्टारने या प्रकारांची माहिती घेतली असून त्या अाधारे सरकारी यंत्रणा वा पाेलिसांना माहिती मिळविणे साेपे हाेणार अाहे.
माेलकरीण,कारागिरांचाही अचानक वाढला ‘भाव’
सर्वसामान्यत:ते लाख रुपयांची रक्कम बाजार समितीपासून तर धान्य विक्रेत्यापर्यंतच्या माेठ्या व्यापाऱ्यासाठी माेठी नाही. माेदी यांनी एका झटक्यात हजार पाचशेच्या नाेटा रद्द केल्यानंतर संबंधितांची गाळण उडाली. बाजारात बेभरवशाच्या व्यक्तीमार्फत हे पैसे चलनात अाणण्याची बाब एकप्रकारे जुगार असल्यामुळे कारागीर, माेलकरिणीसारख्यांना भाव फुटला. त्यांच्या बँक खात्याची विचारणा करून काहींना सुटी देऊन दिवसभर बंॅकेतही पाठवले गेल्याची चर्चा हाेती. खासकरून पंचवटी नाशिकराेड परिसरात बँकांबाहेर माेठ्या प्रमाणात रांगा हाेत्या. विशेष म्हणजे, येथे जुन्या नाेटा देऊन नवीन घेण्यासाठी झालेल्या गर्दीत सर्वसामान्य खासकरून स्लममधील लाेकांची गर्दी अधिक जाणवली. काळा पैसा पांढरा करण्यासाठी ते टक्के माेबदला दिला जात असल्याचीही चर्चा हाेती.
अनेक जण कर्जाची करत आहेत परतफेड
काही लोकांकडे लाखोंच्या पाचशे हजारांच्या नोटा असल्याने त्या बदलायच्या कशा, असा प्रश्न त्यांना पडला अाहे. ही रक्कम व्हाइट करण्यासाठी ते कर्जदार शोधत आहेत. क्रेडिट कार्डचे बिल, वाहन, घर, वैयक्तिक कर्ज भरण्याचीही तयारी अनेकांनी दर्शवली आहे. काहींनी इतर लोकांना कर्जफेडीसाठी पैसेही दिल्याची चर्चा आहे.

‘ब्लॅक मनी’ लपविण्यासाठी इतरांच्या ‌खात्याचा हाेताेय वापर
ज्यांच्याकडे माेठ्या प्रमाणात काळा पैसा अाहे, त्यांना हे पैसे बँकेत जमा करण्यात अडचणी अाहेत. एकत्रितपणे हे पैसे जमा केल्यास त्याची चाैकशी हाेण्याचीही शक्यता अाहे. अशा परिस्थितीत निकटवर्तीय काही लाेकांच्या खात्यात चाळीस ते पन्नास हजारांपर्यंतची रक्कम जमा करून ती पुन्हा काढून घेण्याचे नियाेजन करण्यात येत अाहे. यातून काळा पैसा पांढरा हाेईल, असे सांगितले जाते. काळा पैसा जमविणारी अनेक मंडळी हाच फंडा वापरत असल्याचे एका सनदी अधिकाऱ्याने सांगितले.

बस बुकिंगसाठीही गर्दी
प्रवासात अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ११ तारखेपर्यंत ५०० १००० च्या नोटा स्वीकारल्या जात अाहेत. यामुळेच प्रवासासाठी ५००, १००० च्या नोटा घेऊन बसेसचे आगाऊ बुकिंग करण्यात येत असून तिकीट रद्द केल्यानंतर फक्त २० ते ३० टक्के रक्कम कमी भेटणार असल्याने अनेकांनी आपल्याकडील ब्लॅक मनी खपवण्यासाठी बस बुकिंगचादेखील फंडा स्वीकारला आहे.

तीन लाखांचे काढले रेल्वे तिकीट!
शहरातील एका व्यापाऱ्याकडे पाचशे आणि हजारच्याच नोटा जवळपास पाच लाखांहून अधिक रक्कमेच्या असल्यामुळे त्यांनी या नोटा बदलण्याचा नवीनच फंडा शोधला. गुरुवारी या व्यापाऱ्यांनी तब्बल तीन लाखांहून अधिक रक्कमेचे रेल्वे तिकीट खरेदी केले, तर येत्या दोन- तीन दिवसांत हे तिकीट रद्द करून त्याची रक्कम ते व्हाइट करणार आहेत. याबरोबर शहरातील अनेक व्यापाऱ्यांसह राजकीय नेत्यांनी एअरलाइन्ससह रेल्वेचे तिकीटही बुक केल्याचे समोर येत आहे.

पोस्टाचे तिकीट घेण्याचा अजब फंडा
५०० १००० रुपयांच्या नोटा खपविण्यासाठी अनेकांकडून पोस्टाकडेही धाव घेतली गेली. एरव्ही २, रुपयांत मिळणाऱ्या तिकिटासाठी नागरिक रांगेत उभे राहतात. मात्र, अाता थेट ते १० हजार रुपयांची रक्कम देऊन ही २, रुपयांची तिकिटे खरेदी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकारही पुढे अाला अाहे.

काे-ऑपरेटिव्ह बँकांतही हाेतेय पैशांची ‘हेराफेरी’
नाेटांबाबतचा निर्णय हाेताच काही मोठे व्यापारी राजकीय नेत्यांना या निर्णयाचा धसकाच बसला. आपल्याकडे असलेली पाचशे आणि हजाराची रक्कम कशी बदलायची याची चिंता सर्वांनाच होती. मात्र, मंगळवारी रात्रीपासूनच शहरातील कॉ-ऑपरेटिव्ह बँक, सहकारी बँक, अर्बन सोसायटीत लाखो रुपयांची उलाढाल सुरू होती. बुधवारी आणि गुरुवारी शहरातील काही कॉ-ऑपरेटिव्ह बँक, सहकारी बँक, अर्बन सोसायटीच्या संचालकांकडून या नोटा बदलून देण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्याची चर्चा शहरात होती.
डाॅ. श्रीकांत धिवरे, पाेालिस उपअायुक्त

रेल्वे अारक्षणाला अचानक गर्दी!
गेल्या दाेन दिवसांपासून रेल्वेच्या अारक्षणात कमालीची वाढ झालेली अाहे. सुट्या संपल्यानंतर अचानकपणे अारक्षणात वाढ झाल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात असले तरीही त्यामागचे अर्थकारण मात्र वेगळेच अाहे. रेल्वे तिकिटांसाठी अाणि अारक्षणासाठी पाचशे अाणि हजाराच्या नाेटा चालणार अाहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे पाचशे अाणि हजारांच्या नाेटा अाहेत ती मंडळी लांबलांबच्या अंतरावरील स्टेशनपर्यंतचे अारक्षण करीत असून त्यासाठी पाचशे अाणि हजारांच्या नाेटा दिल्या जात अाहेत. काही दिवसानंतर हे अारक्षण रद्द करून त्यातील ८० टक्के रक्कम परत मिळण्याची शक्कल ही मंडळी लढवत अाहे.

एक हजारची नोट द्या अन‌् सातशे घेऊन जा
जुन्या नाशकात पंचवटी भागात काही लोकांनी लोकांच्या गरजेचा फायदा घेऊन चक्क हजारच्या नोटांचे सातशे ते आठशे रुपयांपर्यंत पैसे दिले. तसेच गॅस सिलिंडर घेण्यासाठी काही जणांनी गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना जास्त पैसे देऊन नोटा स्वीकारण्याची विनंती करत होते. काही कर्मचाऱ्यांनी तर जास्त पाचशेची नोट घेण्यासाठी अतिरिक्त पैसेही घेतल्याची माहिती समोर आली आहे.

माेठ्या नोटा चलनातून बंद झाल्याने गावठाण भागातील अनेक जण हवालदिल झाले आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन काही जणांनी कमिशनवर पाचशे, हजाराच्या नोटा बदलून देण्याचा नवीन धंदा सुरू केल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयाने निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा फायदा घेऊन काही लोकांनी नवीन धंद्यांचा शोध लावला. या लोकांकडून पाचशेच्या नोटांवर ते टक्के रक्कम कमिशन घेण्याचे प्रकार जुने नाशिक, पंचवटी, वडाळा येथे अधिक अाहे.

जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकांचीही चौकशी व्हावी...
^पाचशे हजाराच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा निर्णय झाल्यानंतर शहरातील अनेक सहकारी बँकेतून मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल झाली. अनेकांनी या सहकारी बँकांत काळा पैसा असलेल्या पाचशे हजाराच्या नोटा बदलून घेतल्या. जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकांची चौकशी केल्यास अशी प्रकरणे बाहेर निघतील. -विजय माेगल, बँक कर्मचारी संघटना नेते

असे ही फ्लॅटचे व्यवहार
या सर्जिकल स्ट्राइकदरम्यान शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांनी चक्क व्हाॅट‌्स अॅपवर संदेश टाकत नव्या याेजना जाहीर केल्या अाहेत. त्यातील माहितीनुसार येत्या तीन दिवसांत पाचशे अाणि हजारांच्या नाेटा ‘ब्लॅक अमाउंट’मधून जमा केल्यास त्या स्वीकारल्या जातील. अर्थात सरकारी मुल्यांकनानुसार तितकी रक्कम ‘व्हाइट’प्रमाणेच द्यावी लागेल. विशेष म्हणजे, या संदर्भातील संदेश व्हाॅट‌्सअॅपवर सर्रासपणे पाठविले जात अाहेत.

पैसे घ्या, नंतर साेने द्या
हजार पाचशे रुपयांच्या नाेटा रद्द झाल्यानंतर सराफ बाजारातील छाेट्या व्यापाऱ्यांना थेट मुंबईतील बड्या गुंतवणुकदारांचे फाेन येऊ लागले. मुंबईतील व्यापाऱ्यांच्या हवाल्याने अागाऊ पैसे घ्या नंतर एक ते पाच किलाे साेने द्या अशाही मागण्या हाेऊ लागल्याचे व्यापारी खासगीत सांगत हाेते. या पर्वणीत काही व्यापाऱ्यांनी हातही धुवून घेतल्याचे बाेलले जाते. माेठे साेन्याचे व्यापारी मात्र चार हात दूरच राहिले.
बातम्या आणखी आहेत...