आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी कार्यालयांचा रक्तपेढीस असहकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ऐरवी समाजसेवेचा टेंबा मिरविणाऱ्या सरकारी कार्यालयातील मुखंडांनाही जिल्हा रुग्णालयातील सरकारी रक्तपेढीमार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याबाबत विसर पडला असून, यासंदर्भातील शासनाच्या परिपत्रकाला धुडकावून खासगी रक्तपेढ्यांमार्फत रक्तदान शिबिरे घेतली जात आहेत. सरकारी रक्तपेढीला हात दिला तर गरिबांना वा थॅलेसेमिया किंवा सिकेलसेलग्रस्तांना मोफत रक्त मिळते, याकडेही काणाडोळा केला जात आहे.

जिल्हा रुग्णालयातील सरकारी रक्तपेढीचे सक्षमीकरण केले जात असले तरी येथे रक्ताचा दुष्काळ असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. गोरगरीब रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असून, मोफत रक्त मिळत नसल्यामुळे त्यांना शासकीय वा खासगी रक्तपेढ्यांकडे चकरा माराव्या लागत आहेत. मुळात रुग्णालयातील रक्तपेढी सुविधासंपन्न असल्याचा दावा येथील अधिकारी करीत असताना मग रक्त गोळा का होत नाही, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी रक्तपेढीला दुय्यम स्थान देण्याची भूमिका घेतली असून, याचा अनुभव येथील कर्मचाऱ्यांनीही घेतला आहे. खासगी रक्तपेढ्याकडून आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये दात्यांना चहा-पाणी, नाश्ता अशी व्यवस्था असते. सिव्हिलमधील रक्तपेढीकडून आयोजित शिबिरांमध्ये चहा व बिस्किटापोटी प्रतिरुग्ण दहा रुपयेच तरतूद आहे. दुसरी बाब म्हणजे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना खर्चही मिळत नाही. फोनवर संपर्क साधून प्रतिसाद मिळत नाही.
सर्वांनीच जागे व्हावे
^जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतून गरिबांना मोफत रक्त मिळते. येथे रक्ताचा तुटवडा असेल तर गरिबांवर पदरमोड करून रक्त घ्यावे लागते, ही दुर्दैवी बाब लक्षात घेतली पाहिजे. सरकारी यंत्रणेबरोबरच सर्वांनीच सिव्हिलच्या रक्तपेढीसाठी रक्तदान शिबिरे घेतली पाहिजे. याबाबत जनजागृती केली जाईल.
देवांग जानी, विभागप्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस

यंत्रणेकडूनच दुर्लक्ष

शासन परिपत्रकाप्रमाणे सरकारी रक्तपेढीबरोबरच रक्तदान शिबिरे घेणे बंधनकारक आहे. सरकारी रक्तपेढी खासगीच्या तुलनेत पुरेशा सुविधा देत नाही. त्यामुळे रक्तदातेही सरकारी पेढीकडे पाठ फिरवतात ही वस्तुस्थिती आहे.
पी. जी. बर्दापूरकर, रक्त संक्रमण अधिकारी, जिल्हा रुग्णालय