आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तसंकलनासाठी उद्यापासून अभियान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- उन्हाळ्यात भासणारा रक्ताचा तुटवडा, त्यामुळे अनेकांना गमवावे लागणारे प्राण या पार्श्वभूमीवर गुरुवार(दि. 8)पासून ‘समर चॅलेंज’ अभियान राबविण्यात येत आहे. दैनिक दिव्य मराठी, अर्पण रक्तपेढी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत असून, ते 19 मेपर्यंत सुरू राहणार आहे. यात शहरातील सामाजिक संस्था, कंपन्या, आस्थापना, गणेशोत्सव मंडळे, युवक मंडळे व राजकीय पक्ष यापैकी कोणालाही सहभागी होता येणार आहे.
दानात सर्वर्शेष्ठ दान म्हणून रक्तदान समजले जाते. वर्षभर अनेक संस्था आणि दात्यांकडून रक्तदान केले जाते. मात्र, रक्तसंकलनाचा ओघ दर उन्हाळ्यात घटतो. महाविद्यालयांत सुरू असलेली परीक्षेची लगबग किंवा शालेय सुट्या, लग्नसराई ही याची प्रमुख कारणे मानली जातात. मात्र, नेमक्या याच काळात सुटीचा आनंद घेण्यासाठी प्रवास वाढतात आणि पर्यायाने अपघातही वाढतात, दुसरीकडे सुट्यांच्या काळात अधिकाधिक शस्त्रक्रिया नियोजित केल्या जातात. यामुळे रक्ताची मागणीही वाढलेली असते. यामुळे रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो. शहरातील विविध रक्तपेढय़ांकडे या काळात गरजू रुग्णांच्या नातेवाईकांकडून मोठय़ा प्रमाणावर रक्ताची मागणी केली जाते, परंतु या काळातच रक्तसंकलन पाहिजे तितके होत नसल्याने ही मागणी पुरविता येत नाही. यावर उपाय म्हणून हे रक्तसंकलन अभियान राबविले जात आहे. अभियानात व्यावसायिक आस्थापना, कंपन्या, कामगार संघटना, गणेशोत्सव मंडळे, सामाजिक व राजकीय संस्था, शैक्षणिक संस्था, इतर संस्था यांसह वैयक्तिक सहभागही नोंदविता येणार आहे.