आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तसंकलन अभियानाचा नाशकात आजपासून जागर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- उन्हाळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रक्तपेढय़ांत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा आणि त्यामुळे प्रभावित होत असलेले रुग्ण यावर उपाय म्हणून अर्पण रक्तपेढी, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि ‘दिव्य मराठी’ने हाती घेतलेल्या ‘समर चॅलेंज’ या उपक्रमाला शहरवासीयांनी मोठय़ा प्रमाणावर नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अभियानाचा प्रारंभ गुरुवारी (दि. 8) सकाळी 8 वाजता उत्पादन शुल्क विभाग येथील शिबिरापासून होत असून, दुपारी 3 ते 5 या वेळेत सातपूर औद्योगिक वसाहतीतील ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन कंपनीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘दिव्य मराठी’तून बुधवारी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन प्रसिद्ध होताच अनेक संस्थांनी संवेदनशीलतेचा परिचय देत प्रतिसाद दिला. अभियानात सहभागी होत जास्तीत जास्त रक्त पिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्पही सोडला, जो वाखाणण्याजोगा आहे.
समर चॅलेंज अभियान 19 मेपर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानामध्ये शहरातील विविध सामाजिक संस्था, कंपन्या, आस्थापना, गणेशोत्सव, तसेच युवक मंडळांसह विविध सामाजिक, सार्वजनिक मंडळे, राजकीय पक्ष, संघटना यांपैकी कोणालाही सहभागी होता येणार आहे. शहरातील प्रत्येक संवेदनशील नागरिकाने यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
येथे साधावा संपर्क
ज्यांना शिबिराचे आयोजन करायचे आहे, त्यांनी 9881907677, 88888818193, 8390905725
या मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधवा.
.तर वाचेल बहुमोल जीव
समाजाचे काही तरी देणे लागतो, या भूमिकेतून मुंबई कार्यालयात असतानादेखील आम्ही दर वर्षी रक्तदान शिबिरे घ्यायचो. उन्हाळ्यात विविध रक्तपेढय़ांकडे हमखास रक्तपुरवठा कमी पडत असल्याने थॅलेसेमिया, हिमोफिलियासारख्या रक्ताचे विकार असलेल्या रुग्णांना दररोज, तर काहींना महिन्याला रक्तपुरवठा करण्यात अडथळे निर्माण होतात. विविध अपघातांतील जखमींनाही उपचारांसाठी रक्त आवश्यक असल्याने त्यासाठी प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे. एका रक्तपिशवीने जर कोणाचे प्राण वाचणार असेल, तर वारंवार रक्तदान करावे. याच संकल्पनेतून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, अधिकारी, कर्मचारी, होलसेलर-किरकोळ मद्यविक्रेत्यांनाही शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे. बी. पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग