नाशिक- विधानसभा निवडणूक आणि दिवाळी लागून आल्याने रक्तदान शिबिरांची संख्या घटली. परिणामी, ऑक्टोबर महिन्यात अवघ्या 9 रक्तदान शिबिरांमध्ये 348 बॅगा संकलित करण्यात आल्या आहेत. घटलेल्या शिबिरांमुळे जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तपेढीकडून शिबिरांसाठी आवाहन करण्यात येत आहे.
दिवाळीच्या काळात रक्तदान शिबिरांची संख्या घटते, हा दरवर्षीचा अनुभव आहे. विधानसभा निवडणूक आणि दिवाळी सोबत आल्याने रक्तदान शिबिरांना अल्प प्रतिसाद मिळाला. शासकीय रक्तपेढीकडून सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि शासकीय कार्यालयांना आवाहन करण्यात आले होते. यास अल्प प्रतिसाद मिळाला. शासकीय रक्तपेढ्यांना खासगी रक्तपेढीकडून रक्त घ्यावे लागत आहे. शासकीय कर्मचारी निवडणूक कामांत, तर राजकीय पदाधिकारी प्रचारात व्यस्त असल्याने शिबिरांना प्रतिसाद मिळाला नाही. या काळात केवळ नऊ शिबिरे घेण्यात आली. अवघ्या ३४८ बॅगा संकलित करण्यात आल्या. खासगी पेढ्यांनादेखील या कालावधीत फटका बसल्याचे समजते.
संकलित रक्तसाठा
ऑक्टोबर महिन्यात झाल्या 9 रक्तदान शिबिरांमध्ये 348 बॅगा रक्त संकलित करण्यात आले. जयंती, सामाजिक उपक्रम आणि औद्योगिक वसाहतींमध्ये शिबिरांचे आयोजन केले होते.
यामुळे घटली शिबीरांची संख्या
विधानसभेच्या निवडणूक कामांत शासकिय अधिकारी-कर्मचारी व्यस्त होते. तर, राजकीय पदाधिकारी प्रचारात व्यस्त असल्याने शहर तसेच जिल्ह्यांत होणाऱ्या रक्तदान शिबिरांची संख्या घटली.
गरजूंसाठी पर्याय उपलब्ध
जिल्हा शासकिय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शहरातील खासगी रक्तपेढ्यांकडून गरजूंना अल्प दरात रक्त पुरवठा उपलब्ध केला जात आहे.