आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Board Give Tenth Days For Twelth Answer Paper's Examination

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यास मंडळाने दिले दहाच दिवस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीकरिता माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे नियामकांना मिळणारा कालावधी यंदा निम्म्यावर करण्यात आल्याने शिक्षकांनी नाराजीचा सूर आळवला आहे. यामुळे निकाल लांबण्याचीही शक्यता आहे.

विविध मागण्यांबाबत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर घातलेले बहिष्कार आंदोलन संपल्यानंतर मंडळातर्फे रविवारी (दि. 17) रावसाहेब थोरात सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या विभागातील सर्व नियामक व मुख्य नियामकांच्या सभेत अनेक प्राध्यापकांनी बोर्डाने केलेला हा बदल म्हणजे जणू आंदोलनकर्त्या शिक्षकांना शिक्षाच असल्याचे म्हटले.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर घातलेल्या बहिष्कार आंदोलनादरम्यान 23 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीतील नियामकांची सभा आंदोलनामुळे घेतली गेली नव्हती. या कालावधीतील इंग्रजीपासून ते इतिहासापर्यंतच्या तब्बल 450 नियामकांची रविवारी सभा घेण्यात आली. यामध्ये पेपर तपासणीविषयीच्या सूचना, पेपरमधील काही चुका असल्यास त्यांची दुरुस्ती, पेपर तपासणीच्या कामकाजाचे वेळापत्रक व उत्तरपत्रिका जमा करण्याचे वेळापत्रक आदी बाबींविषयी नियोजन करण्यात आले. दरम्यान, शिक्षकांनी कबूल केल्याप्रमाणे आंदोलन काळात होणारे नुकसान भरून निघण्याकरिता अधिक वेळ खर्च करून उत्तरपत्रिका वेळेत तपासून देण्याची जबाबदारी शिक्षकांनी घ्यावी या न्यायाने मंडळाने दिलेल्या कामकाजाच्या सुधारित वेळापत्रकामध्ये शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी केवळ 10 दिवसांचा अवधी मिळाला आहे.

प्रत्येक परीक्षकाकडे दीडशे उत्तरपत्रिका
प्रत्येक नियामकाकडे अंदाजे 6 परीक्षक असतात व प्रत्येक परीक्षकाकडे 150 ते 175 उत्तरपत्रिकांचा गठ्ठा असतो. त्यामुळे या प्रत्येक परीक्षकाला वेळोवेळी सूचना देऊन काम करून घेणे इतक्या अल्पमुदतीत जड जाणार असल्याची चिन्हे दिसत असल्याचे मत अनेक नियामकांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केले आहे.