आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदावरीत एक काेटीची ‘बाेटसफाई’, एकाच पात्रात सफाईसाठी दाेन कंत्राटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अार्थिक खडखडाटाचे नगारे वाजवून नागरी विकासकामांना थांबा दाखवणाऱ्या महापालिकेने गाेदावरी सफाईच्या माध्यमातून तिजाेरीवर जणू हातच साफ करण्याचा प्रयत्न तर चालवला नाही ना, अशी शंका येत असून, यापूर्वी गाेदापात्राच्या मशीनद्वारे सफाईसाठी ९९ लाख रुपयांचा ठेका दिला असताना पुन्हा याच पात्राची बाेटीमार्फत सफाई करण्यासाठी महासभेवर काेटी लाख रुपयांचा प्रस्ताव ठेवला अाहे. परिणामी, एकाच कामावर सिंहस्थ महापालिका अशा दाेन माध्यमांतून हाेणाऱ्या खर्चाला नगरसेवक मंजुरी देतात की फेटाळतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले अाहे.

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेची अार्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे महत्त्वाची कामे खाेळंबली अाहेत. रस्ते, पाणीपुरवठ्यासारख्या कामांसाठी स्वतंत्र निधीच नसून, नगरसेवकांनी कामे सुचविली तर त्यासाठी स्वनिधीतून कामे करण्याचा सल्ला दिला जात अाहे. अशा बिकट परिस्थितीत महापालिका मात्र स्वत: खर्च करण्यासाठी काेणतीही काटकसर करण्यास तयार नसल्याचे चित्र अाहे.
गाेदावरी स्वच्छतेच्या एकाच कामासाठी दाेन वेगवेगळे ठेके दिले जात असून, त्यातून त्याची प्रचीती येत अाहे. यापूर्वी स्थायी समितीने नाेव्हेंबर महिन्यात गाेदावरी नदीतील तरंगते साहित्य, निर्माल्य तत्सम वस्तू काढून स्वच्छता पवित्रता राखण्यासाठी दाेन फ्लाेटिंग ट्रॅश स्कॅनर मशीन भाड्याने घेण्यास हिरवा कंदील दाखवला हाेता. सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखर्चित निधी या ठिकाणी वळवला नाही तर व्यपगत हाेईल, असे अाराेग्याधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांनी स्थायी समितीत स्पष्ट केले हाेते. त्यावेळी मराठवाड्याला नुकतेच पाणी साेडले असल्यामुळे गाेदावरी प्रवाही असल्यामुळे यंत्रांचा उपयाेग हाेणार नाही, असाही युक्तिवाद झाला हाेता. त्यावर डेकाटे यांनी अाता मंजुरी दिली तर भविष्यात मशीनचा वापर करता येईल, असे सांगितले हाेते. प्रत्यक्षात गाेदावरीत अाताही फारशा पाणवेली नसून, संबंधित मशिनरीचाही वापर झालेला नाही. अशातच मंगळवारी (दि. १२) हाेणाऱ्या महासभेत काेटी लाख रुपयांचा खर्च बाेटीद्वारे हाेणाऱ्या नदी सफाईच्या नावाखाली करण्याचा प्रस्ताव अाहे.

या पार्श्वभूमीवर अाता मूलभूत कामांसाठी निधी मिळविण्यासाठी संघर्ष करणारे नगरसेवक मुळातच संशयास्पद असलेल्या या प्रस्तावाला कशा पद्धतीने मंजुरी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

काय अाहे प्रस्तावात?
अानंदवलीपूल ते नांदूर नाक्यापर्यंतच्या गाेदावरी पात्राचा बाेटीच्या साहाय्याने सफाई करण्याचा प्रस्ताव अाहे. गाेदावरी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेचा संदर्भ देऊन पाणवेलींपासून निर्माल्यापर्यंतची सफाई करून नदी प्रवाही करण्याचा उद्देशही व्यक्त केला अाहे. चार बाेटींद्वारे सफाई करणे, प्रत्येकी तीन कर्मचारी बाेटीवर नेमणे ५०० मीटर अंतरावर एक कर्मचारी ठेवणे, अशा अटी घालण्यात अाल्या अाहेत.