आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपन्यांच्या गोंधळामुळे रखडले बोटक्लबचे कंत्राट, तात्पुरत्या स्वरूपात एजन्सी नेमण्याचा पर्याय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूर धरणावर उभारण्यात आलेला बोटक्लब खासगी कंपन्यांमार्फत चालविण्यात येणार होता. त्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेत सहभागी तीनही संस्थांचे बहुतांशी कागदपत्रे एकसमानच असल्याने त्यात काहीतरी काळेबेरे झाल्याचा संशय वाढला आहे. त्यामुळे आता बोटक्लब चालविण्यासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचे वॉटर स्पोर्ट‌्सचे व्यवस्थापक सुबोध किनालेकर यांनी सांगितल्याने या प्रकरणाला वेगळाच वास येण्यास सुरुवात झाली आहे. 
 
जवळपास २० कोटी रुपये खर्च करून गंगापूर धरणावर अांतरराष्ट्रीय दर्जाचा बोटक्लब उभारण्यात आला आहे. त्यास प्रथम पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमींसह विविध संघटनांनी विरोध केल्यानंतर सर्व अडचणींतून बाहेर पडल्यानंतरही या प्रकल्पाचे शुक्लकाष्ठ काही सुटत नसल्याचे स्पष्ट झाले. ज्या कंपनीला हे कंत्राट जवळपास निश्चित करण्यात आले होते तिचीच बहुतांशी कागदपत्रे ही इतर दोन बाद झालेल्या कंपन्यांकडेही असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मेरीटाइम बोर्डाकडे नोंदणीचाही दाखला एकच असल्याचेही सांगण्यात येते. तर, बँक गॅरंटीही जुनीच असल्याचे खात्रीलायकपणे सांगण्यात आल्याने पात्र संस्थेला अपात्र करण्यात आले अाहे. शिवाय, तेथे बेकायदा काही कामे केल्याचाही संशय असल्याने आता पुन्हा नव्यानेच टेंडर काढले जाणार आहे. त्याची प्रक्रियाही सुरू झाल्याचे सांगण्यात येते. परंतु, सर्व कागदपत्रे समोर असतानाही असे आंधळेपणानेच ठेका देण्यावर शिक्कामोर्तब कसे झाले, असा प्रश्न उपस्थित होत असल्याने यातून महामंडळाचे वरिष्ठ स्तरावरील अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात मिलीभगत असल्याचा संशय वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

मात्र, या सर्वच गोंधळाचा फटका केवळ नाशिककरांना बसत असून, आता पुन्हा संपूर्ण उन्हाळी सुटी संपल्यानंतरही नाशिककरांना या बोटक्लबचा आनंद घेण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

फेरनिविदा काढण्यास वा संस्था नियुक्तीसाठी विलंब होत असल्यास उन्हाळी सुट्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात एखादी संस्था नियुक्त करावी. जेणेकरून बोटींची देखभाल होऊ शकेल. यासाठी प्रादेशिक पर्यटन महामंडळाकडून वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु, अद्याप त्याचा विचारच झाला नसल्याने या सुट्यांमध्येही बोटक्लब बंदच राहणार असल्याची शक्यता आहे. 

लाखो रुपये खर्चून खरेदी केलेल्या बोटी अशा धूळखात पडल्या आहेत. या बोटक्लबलगत उभारण्यात आलेल्या प्रशस्त इमारतीचीदेखील यापेक्षा वेगळी स्थिती नाही. केवळ शासकीय लालफितीच्या अनागोंदीमुळे हा संपूर्ण प्रकल्प बाजूला सारला गेला आहे. 
बातम्या आणखी आहेत...