आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस नावाने एलबीटी चुकवणार्‍यांवर धाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बोगस नावाने एलबीटी चुकवेगिरीचा प्रयत्न करणार्‍या, तसेच नोंदणी न करता व्यवसाय करणार्‍या चौघा व्यापार्‍यांवर महापालिकेने छापा टाकून पाऊणेचार लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच या बरोबरच आयुक्त संजय खंदारे यांनी नोटीस बजावून दोन वर्षांच्या कारवासाची शिक्षा का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीसही दिल्याने व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. कामटवाडे येथील ओम एंटरप्रायजेस यांच्याकडील वाहनातून (जी.जे. 4, एक्स 5521) 10 लाख मूल्याचे प्लायवूड उतरवले जात होते. महापालिकेच्या पथकाने छापा टाकल्यानंतर त्यांनी एलबीटीची नोंदणी केली नसल्याचे निदर्शनास आले. त्यांना 1 लाख 81 हजाराचा दंड करण्यात आला. पंचवटीतील भाविक डेव्हलपर्स यांनीही नोंदणी नसताना वाहनातून (एम. एच. 15, डी. वाय . 4907) 4 लाख 55 हजार रुपयांचे स्टिल आणले होते. त्यांना 81 हजार 988 रुपयांचा दंड करण्यात आला. तर, याच वाहनात आस्थापनेचे नाव अंबिका-शक्ती एंटरप्राइजेस असे असताना त्यावर अंबाशक्ती कंपनी असे बोगस बिल तयार करून चार लाख 29 हजार रुपयांचा माल आणला गेल्याचे आढळून आले. त्यात 77 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. नवीन आडगाव नाका येथील उमिया सिरॅमिक्सने बजरंग रो-हाउस यांच्या नावाचे बोगस बिल तयार करून एम. एच. 15 डी. जे. 7810 या वाहनातून दोन लाख 47 हजाराचा माल आणला होता. त्यांना 42 हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

एलबीटी वसुली वेगात
21 मेपासून एलबीटी वसुली सुरू झाल्यानंतर महिनाअखेरीस आठ कोटींचा कर मिळाला होता. जूनमध्ये 53 कोटी, तर जुलैमध्ये 40 कोटींचा एलबीटी जमा झाला. ऑगस्ट महिन्यात 20 तारखेपर्यंत किती एलबीटी जमा झाला याची हे स्पष्ट होऊ शकेल.