नाशिक - महाराष्ट्रात बोगस पीएच.डी.चे पेव फुटलेले असतानाच आता आरोग्य विज्ञान विद्यापीठातही दुसर्याने सादर केलेले शोधनिबंध (रिसर्च पेपर) स्वत:च्या नावाने सादर करत विद्यापीठात मोठमोठी पदे भूषविणार्या 10 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांनी राजीनामे दिले असून, विद्यापीठाच्या विविध समित्यांवरील त्यांचे सदस्यत्वही रद्द झाले आहे.
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, तरुण पिढीचे भविष्य घडविणार्या शिक्षकांसाठी शिक्षण पद्धतीची ध्येय-धोरणे ठरविणारे विद्यापीठातील अधिकारी हे उच्चशिक्षित असावेत. यासाठी महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ स्तरावरील वरिष्ठ पदांवर नेमणुकीसाठी शोधनिबंधांची अट घातली होती. त्यानुसार त्यांचे मूल्यमापन केले जाते.
हा फसवणुकीचा गुन्हा
दुसर्याच्या नावाने प्रसिद्ध झालेले रिसर्च पेपर स्वत:च्या नावाने खपविणे हा वाड्मयचौर्याचा गुन्हा आहे. त्याबरोबर विशिष्ट पदासाठी ही पात्रतेची अट असल्याने त्यासाठी दुसर्याचा पेपर सादर केल्याचे सांगणे आणि खोटा दस्तऐवज तयार करणे हा फसवणुकीचाच गुन्हा आहे. अँड. श्रीधर माने, सरकारी वकील