आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळेत प्रीती झिंटाने केले सवत्स गोदानविधिपूर्वक दान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - बॉलीवूडसोबतच आयपीएल संघाच्या मालकीमुळे गाजलेली ग्लॅमरस अभिनेत्री प्रीती झिंटाचे अनोखे रूप सिन्नर तालुक्यातल्या निऱ्हाळेतील अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना अनुभवण्यास मिळाले.
आठवडाभरापूर्वीच या गावातील २० शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्यानंतर रोजगार नसलेल्यांना दुग्ध व्यवसायासाठी गायी दान करण्याचे तिने ठरवले आणि अचानक शनिवारी सकाळी १० वाजताच निऱ्हाळे गावात येऊन प्रीतीने पुरोहिताद्वारे शास्त्रशुद्ध पूजन करून तीन जणांना सवत्स धेनूचे (दुधाळ गाय-वासरू) दान केले. ग्रामस्थांची विचारपूस करत पाण्याचे टँकर सुरू करण्याचा विचारही प्रीतीने या वेळी बोलून दाखवला.
ऐनवेळी बदलले लाभार्थी :
गायी दान देण्याचे ठरवल्यानंतर प्रीतीने ग्रामस्थांना तीन गरजूंची नावे काढण्यास सांगितले होते. मात्र, सकाळी गावात आल्यानंतर तिने ऐनवेळी यादीत बदल केले. गावातील पुरोहितास बोलावून शास्त्रशुद्ध पूजन केल्यानंतर पुरोहिताची चौकशी केली. कुटुंबातील संख्या, उपजीविकेची साधने यांची माहिती घेतल्यानंतर गाय सांभाळाल काय अशी विचारणा करून प्रीतीने पहिली गाय पुरोहित बाळकृष्ण मुळे यांना दिली.
नंतर गर्दीत बसलेल्या नामदेव आव्हाड या निराधार वृद्धास जवळ बोलावून घेत त्यांची आस्थेवाईक चौकशी करून दुसरी गाय त्यांना, तर रामचंद्र काकड यांना अशाच प्रकारे गरज आहे की नाही याची खात्री करून गाय दिली. या सर्वांना तिने वाकून नमस्कार केला व गायींची विक्री न करता कुटुंबासाठी सांभाळ करण्याचे अभिवचन घेतले.

निऱ्हाळेवर अशी जुळली प्रीती.. :
निऱ्हाळेचे भूमिपुत्र संरोष दराडे मुंबईत चित्रपट व्यावसायिक दानिश मर्चंट यांच्याकडे नोकरी करतात. अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत प्रीतीने इच्छा व्यक्त केल्यावर सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे गावचे दराडे आपल्याकडे आहेत त्यांचे गाव समस्याग्रस्त आहे अशी माहिती मर्चंट यांनी दिली. प्रीतीने दराडे यांना बोलावून मदतीचे नियोजन केले. त्यांच्यामार्फत गेल्या आठवड्यात २० जणांना आर्थिक मदत पाठवली.

गोदानासाठी ग्रहणाचा मुहुर्त? :
प्रीती झिंटाने गोदान करण्यासाठी २८ एप्रिल ही तारीख दिली होती. मात्र ऐनवेळी शनिवारी निऱ्हाळेत येवून गोदान केल्याने चर्चेचा विषय झाला. शनिवारी चंद्रग्रहण असल्याने या दिवशी दान करण्याने पुण्य लाभते, अशी समजूत आहे. तो मुहुर्त तर प्रीतीने साधला नाहीना अशीही चर्चा रंगली.
प्रसिद्धीपासून दूर

प्रीती येणार असल्याची माहिती मोजक्या मंडळींना शुक्रवारी रात्री देण्यात आली. १० च्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीतून प्रीतीचे आगमन झाले. मात्र, गर्दीत छायाचित्रकार व दूरचित्रवाहिन्यांचे कॅमेरे दिसताच त्यांना दूर जाण्याची सूचना करत ही मंडळी निघून गेल्यानंतरच प्रीती गाडीच्या खाली उतरली.

ठेचा-भाकरी घेतली बांधून

दानिश मर्चंट यांनी दराडे यांच्या घरी नाष्टा करताना ठेचा-भाकरी खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रीती झिंटा व दानिश आतिथ्यासाठी गेले. मात्र, उपवास असल्याने प्रीतीने केवळ फलाहार केला, तर मर्चंट यांनी ठेचा-भाकरीचा आस्वाद घेतला. या मराठमोळ्या खाद्यपदार्थाची प्रीतीने मोठ्या उत्सुकतेने चौकशी केली. उपवास सोडताना सायंकाळी मी नक्की ठेचा-भाकरी आवडीने खाईन, असे म्हणत प्रीतीने ठेचा-भाकरी बांधून घेतली.