आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मृतांच्या वारसदारांना त्वरित कामावर घ्या’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मृत कामगारांच्या वारसांना कामावर घेण्यासाठी कंपनीने आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग उत्तीर्णतेसह घातलेल्या इतर अटी रद्द करण्यावरून सभेत झालेल्या प्रचंड गोंधळामुळे त्या अटी रद्द करण्याला एकमुखी संमती देत पूर्वीप्रमाणेच दहावी उत्तीर्ण झालेला वारसदारदेखील मृत कामगाराच्या जागी कामावर घेण्याचा ठराव बॉश एम्प्लॉइज युनियनच्या दादासाहेब गायकवाड सभागृहातील वार्षिक सभेत रविवारी झाला.

दर चार वर्षांनी कंपनीत या कर्मचार्‍यांसोबत सर्वच गोष्टींच्या मागणीसाठी तडजोड करार केला जातो. त्यानुसार आता कामगाराच्या मुलगा, भाऊ आणि मेहुण्याला वारस म्हणून कामावर घेतले जात होते. त्यात सुधारणेची मागणी कर्मचार्‍यांतर्फे दिगंबर जाधव यांनी मांडत या तिघांसह महिला सबलीकरणाचे धोरण स्वीकारत मुलगी, पत्नी, बहीण आणि एखाद्या कर्मचारी महिलेच्या पतीचाही समावेश करण्याची मागणी केली. त्यास सभागृहातील कर्मचार्‍यांनी तत्काळ मंजुरी दिली.

या वारसांना प्रशिक्षणार्थी कालावधीसाठी निवडले जाते. त्यानंतर बदली कामगारांच्या जागी बोलवले जाते व नंतर रिक्त जागेनुसार कायम केले जाते. यात बराच काळ जातो. प्रत्यक्षात एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास ती जागा रिक्त असतानाच कंपनी व्यवस्थापनाने यात लक्ष घालण्याची गरज असते असे म्हणून. व्यवस्थापनासोबत कुठलाही करार करताना आधी सभा घेण्याची मागणीही कर्मचार्‍यांनी केली.

यावेळी कर्मचार्‍यांच्या मृत्यू फंडात थेट शंभर रुपयांनी वाढत करत तो दोनशे रुपये करण्यात आला. विशेष म्हणजे, युनियनच्या मागील वेळच्या बैठकीत कौन्सिलर मेंबरच्या निवडणुका घेण्याचा ठराव झाला. मात्र, त्याची अंमलबजावणीच झाली नसल्याचे कांचन थोरमिसे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर सचिव हेमंत आहेर यांनी व्यवस्थापनाने संमती दिली नसल्याचे सांगत वेळ मारून नेली.

याप्रसंगी अध्यक्ष अशोक वरखेडे, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, श्याम कदम, खजिनदार अजय चव्हाणके, सहसचिव संदीप दौंड यांसह पदाधिकारी आणि कंपनीचे कामगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

टीजीवरून कर्मचार्‍यांत मतभेद
कंपनीत 25-30 वर्षे जुनी मशिनरी असून, तिचे पार्ट्स मिळण्यासही अडचणी येत असल्याने कर्मचार्‍यांना काम करणे अवघड जात आहे. त्यामुळे विशिष्ट वेळेत एखादा प्रकल्प कसा तयार होणार, याबाबतच्या अडचणी समजून न घेता व्यवस्थापनाने आता टीजीप्रमाणे काम करण्याचा नवा उपक्रम प्लांट नंबर 101 मध्ये सुरू केला आहे. त्यानुसार काम करण्यास या प्लांट कर्मचार्‍यांनी विरोध केला. सचिव आणि अध्यक्षांनी त्यावर बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; मात्र सहसचिव संदीप दौंड यांनीच थेट माइक हातात घेत त्यास विरोध असल्याचे सांगत युनियनलाच घरचा आहेर दिला. काहींनी ही संकल्पना कर्मचार्‍यांच्याच फायद्याची असल्याचे खासगीत सांगून केवळ विरोधकांकडून राजकारण करून चुकीच्या पद्धतीने ती मांडली जात असल्याचे सांगितले.

नफ्याप्रमाणे कर्मचार्‍यांना दोन टक्के पगारवाढ हवी
2002 ते 2012 दरम्यान कंपनीची विक्री 1730 कोटींवरून 9374 कोटींपर्यंत पोहोचली आहे. त्यात नफाही 58 टक्के असून, त्याच प्रमाणात कर्मचार्‍यांना पगारवाढ मिळावी. 0.96 टक्के एवढाच खर्च कर्मचार्‍यांच्या पगारासाठी येतो. मारुती कंपनीने एकूण विक्रीच्या 2.60 टक्के पगारवाढ कर्मचार्‍यांना दिली आहे. म्हणून आम्हालाही दोन टक्के पगारवाढ मिळावी, अशी मागणी संजय परदेशी यांनी केली.