आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट नाशिकसाठी आता विकासाचा ‘ बोस्टन पॅटर्न’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभथॉनच्या निमित्ताने बोस्टन दौऱ्यासाठी गेलेल्या महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्मार्ट सिटी साकारताना महत्त्वाच्या प्रश्नांवर कसे उपाय योजावे, याचा अभ्यास करून नाशिकमध्ये काही महत्त्वाचे प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात असे प्रकल्प राबविताना स्थानिक नागरिकांना प्रबोधन करणे तसेच महापालिका पदाधिकारी नगरसेवकांशी चर्चा करूनच अंतिम अंमलबजावणी केली जाणार आहे.

या सर्वात वाहतूक कोंडीच्या समस्येवर केंद्रीय वाहनतळ व्यवस्था अर्थातच सेंट्रलाईज पार्किंग सिस्टिमचा बोस्टनमधील पर्यायाचा उपाय करण्याचा विचार असून, अपस्ट्रीट आणि ऑनस्ट्रीट अशा दोन पध्दतीने शहरात सुसज्ज आधुनिक यंत्रणा असलेली वाहनतळे कसे विकसित करता येईल, याचा आराखडा करण्यासाठी सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. अमेरिका दौऱ्यावरून परतलेल्या आयुक्तांनी बोस्टन न्यूयॉर्क या दोन शहरांचा अभ्यास करून तेथील काही चांगले प्रकल्प नाशिकमध्ये कसे राबवता येतील, याची चाचपणी सुरू केली आहे. त्यासंदर्भात ‘दिव्य मराठी’शी बोलताना दोन्ही शहरातील वाहतूक कोंडी, वाहनतळ, रस्ते, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक आदींची माहिती देत असे यशस्वी प्रकल्प नाशिकमध्ये शक्यच नाही, असे कोणीही समजू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी सर्वप्रथम कार्यक्षम सेवा (इफिशियन्ट सर्व्हिसेस) द्यावी लागेल त्यानंतर उच्च वापर दर अर्थातच हाय युजर रेट याच्याशी सांगड घालून अंतिमत: जास्तीत जास्त कार्यक्षम सेवा असे समीकरण साकारता येईल. त्यासाठी सर्वप्रथम शहरवासीयांची मानसिकता बदलावी लागणार असून, तसे झाले तर परदेशातील चांगल्या योजना नाशिकमध्ये साकारू शकतील.

खासगी वाहनतळांना प्रोत्साहन : अमेरिकेत प्रत्येक कुटुंबाला एक कार असे जवळपास प्रमाण आहे. प्रत्यक्षात येथील रस्त्यावर कारची संख्या अत्यंत कमी होती. रस्त्यावर गाड्या नाहीत, इमारती खाली दिसत नाही. मग कोठे असतील वाहने असा प्रश्न होता. त्याचे उत्तर बोस्टन येथे एका मित्रासमवेत जेवण्यासाठी गेल्यावर डॉ. गेडाम यांना मिळाले. हॉटेलमधून परतल्यानंतर जेवणाचे वाहन जेथे लावले तेथील दोन्ही कार्डवरील बिल चक्क समान म्हणजेच ३० डॉलर होते. आयुक्तांनी उत्सुकतेने विचारले असता येथे ठराविक काही अंतरानंतर बहुमजली इमारतीत वाहनतळे असून, रस्त्यावर वाहन लावले तर चोवीस तासात केव्हाही वाहन उचलून नेण्याची कारवाई तितकाच कठोर दंडही होतो. खासगी वाहनतळांची संख्या मोठी असून, त्याचे दर जास्त असले तरी वाहनचालकांना समजेल अशा शब्दात त्याचे गणितही पटवून दिले आहे.

रस्त्यांचा ग्रीड पॅटर्नही प्रभावी : बोस्टनवा न्यूयॉर्कमध्ये रस्त्यांचा ग्रीड पॅटर्न आहे. विशेष म्हणजे येथील बहुतांश रस्ते अरुंद असूनही वाहतूक कोंडी नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजेच सर्व रस्ते एकाच रांगेत आहेत. केवळ एकच मोठा रस्ता त्यास छेदून गेला आहे. ग्रीड पॅटर्नमुळे बहुतांश रस्त्यावर एकतर्फी वाहतूक होते. त्यामुळे बेशिस्त वाहतुकीला आळा बसतो. नाशिकमध्ये बोहरपट्टी, दहीपूल, श्रीमंत साक्षी मंदिराकडे जाणाऱ्या छोट्या रस्त्यावर एकेरी वाहतूक केली तर वाहतूक कोंडी कमी होईल. असेच शहरातील सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करून उपाय करता येतील.

विकासआराखडा नाही तरी, उद्याने : बोस्टनचा विकास आराखडा नसून येथे जमीन संपादन, त्यापोटी होणारा खर्च आदी बाबींचा भार स्थानिक प्रशासनावर नाही. मात्र, त्यानंतरही लोकांनी स्वयंशिस्त पाळून मोकळ्या जागा सोडल्या आहेत. येथे पुरेशी उद्यानेही असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.

वनौषधी उद्यान घेईल सेंट्रल पार्कची जागा : १८५०मध्येच भविष्याचा विचार करून मध्यवस्तीतील दीडशे एकर जागा सेंट्रल पार्कसाठी राखीव ठेवली गेली. आज या ठिकाणी चार किलोमीटर लांब अर्धा किलोमीटर रुंद अशा जागेतील पार्कमध्ये जंगल तयार झाले आहे. या पार्कमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले तर गेलेच. मात्र, लोकांनाही फिरण्यासाठी मोठी जागा उपलब्ध झाली. नाशकात मध्यवस्तीत जागा नसली तरी, पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या वनौषधी उद्यानाला सेंट्रल पार्कप्रमाणे विकसित करता येईल का? याचा विचार सुरू आहे.

काय आहे गणित...
बोस्टनमध्ये रस्त्यालगत असलेल्या दुकानाचे क्षेत्र त्याला आकारले जाणारे चौरस फुटाचे भाडे याचा हिशेब लोकांना पटवून देण्यात आला. १०० चौरस फुटाच्या जागेचे मासिक भाडे दहा हजार रुपये असेल तर त्याचे प्रति तासाप्रमाणे होणारे भाडे किती हे सांगितले. आता अशा गाळ्यासमोरील, रस्त्यावरील जागेचे प्रति तासाप्रमाणे भाडे काढले तर निश्चितच अधिक असेल, असे गणित मांडले. नाशिकमध्ये अशाच पद्धतीने लोकांना पटवून दिले तर खासगी वाहनतळाचा पर्याय निश्चित स्वीकारला जाईल. त्यासाठी सर्वमान्य असे ठराविक भाडे निश्चित करून निर्णय घेणे शक्य होईल.

असे होईल नाशिक स्मार्ट
>केंद्रीयवाहनतळासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती.
>रस्त्यांचा ग्रीड पॅटर्नही प्रभावी.
>वनौषधी उद्यानाच्या जागी सेंट्रल पार्क.

यामुळे स्मार्ट बोस्टन
>प्रतिकुटुंबकार असली तरी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर केला जातो.
>नाशिकपेक्षा सहापट अधिक कचऱ्याची निर्मिती, मात्र संकलन प्रभावी असल्यामुळे कागदाचा कपटाही नाही.
>दुकानदारांना कायद्यात स्वत:ची स्वच्छता स्वत: करण्याची तरतूद.

लोकसहभागातून होणार स्मार्ट सिटी...
चांगल्या योजना राबवण्यात बोस्टनमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा ठरल्याचे दिसले. नाशकात वाहनतळ अन्य सुविधा देणे अवघड नाही. कार्यक्षम सेवा उच्च वापर दर यांची सांगड घातल्यास कार्यक्षम सेवा मिळू शकेल. त्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक, प्रशासन वा सामाजिक संस्था या सर्वांना एकत्र करून निर्णय घेतले जातील. डॉ.प्रवीण गेडाम, आयुक्त, महापालिका
बातम्या आणखी आहेत...