आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-पुणे महामार्गाला ब्रेक, द्वारका ते नाशिकरोडदरम्यान जंक्चर बंद करण्यास विराेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - नाशिक-पुणे महामार्गावरील महापालिका हद्दीतील द्वारका ते नाशिकराेड दरम्यानच्या रस्त्यावरील जंक्चर बंद करण्यास नागरिक संघटनांच्या हाेणाऱ्या विराेधामुळे या महामार्गाच्या विस्तारीकरणाची गती मंदावली अाहे.
तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नानंतर नाशिक-पुणे महामार्गाच्या विस्तारीकरणाला मंजुरी मिळाली. द्वारका ते नाशिकराेडदरम्यानच्या महामार्गाचे सहापदरीकरण तर सिन्नर फाटा ते सिन्नरदरम्यान चाैपदरीकरणाचा निर्णय झाला. सन २०१२मध्ये महामार्ग विस्तारीकरणाचे माेठ्या धुमधडाक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सिन्नर फाटा येथे उद‌्घाटन करून झाले. भूसंपादन, अतिक्रमण, वृक्षांच्या अडथळ्यांमुळे महामार्ग विस्तारीकरणाचे काम जवळपास दाेन वर्षे रखडले.

दरम्यान, दाेन महिन्यांपूर्वी विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात अाले हाेते. सिन्नर फाटा ते शिंदे गावापर्यंत महामार्ग विस्तारीकरणात अडसर ठरणारे अतिक्रमण हटविण्यात येऊन काही ठिकाणी जमिनी संपादित करून जमिनीची लेव्हल करण्यात अाली. मात्र, अद्यापही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही.

महापालिका हद्दीत द्वारका ते नाशिकराेड दरम्यान या महामार्गाचे सहापदरीकरण हाेणार अाहे. या ठिकाणी जमीन संपादनाचा विषय नसून, विस्तारीकरणाच्या कामात वृक्षांचा अडथळा येत अाहे. न्यायालयात दाखल करण्यात अालेल्या जनहित याचिकांमुळे वृक्षताेड हाेऊ शकली नसल्याने सहापदरीकरणाचे हे काम थंडावले अाहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एप्रिलअखेर हे काम पूर्ण करण्याची मुदत असल्याने महामार्ग प्राधिकरणाने दत्तमंदिर चाैकापासून द्वारकापर्यंत महामार्गावर ठिकठिकाणी असलेले जंक्चर बंद करण्याचे काम हाती घेतले अाहे. मात्र, या कामांना आधी प्रशासकीय आता नागरिकांकडूनही अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
कामाच्या सुरुवातीपासून अडथळ्यांना सुरुवात झाली. जंक्चर बंदमुळे वाहतुकीस लांब पल्ला गाठावा लागेल, या कारणास्तव ठिकठिकाणी अाजूबाजूचे रहिवासी, संघटनांकडून जंक्चर बंदला विराेध झाला. हा विराेध डावलत महामार्ग प्राधिकरणाने बिटकाे महाविद्यालयापर्यंतचे तीन जंक्चर बंद केले. मात्र, विराेधकांशी वाद घालण्यात वेळ वाया जात असल्याने जिथे विराेध हाेत हाेता. तेथील जंक्चर सुरू ठेवून पुढचे बंद करण्यास सुरुवात केली. परिणामी महामार्गाच्या विस्तारीकरणाला विविध अडथळ्यांमुळे सुरुवात हाेऊ शकली नसल्याने विस्तारीकरणाची गती मंदावल्याने वेळेत पूर्ण हाेणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले अाहे.

प्राधिकरणाकडून दत्तमंदिर ते द्वारकादरम्यान नव्याने दुभाजक टाकण्यात येत अाहेत. हे सुुमारे अडीच फूट उंचीचे सिमेंटचे दुभाजक अाहेत. त्यावरून उडी मारून काेणी जाऊ नये म्हणून त्यामध्ये सात फुटांची लाेखंडी ग्रील लावण्यात येत अाहे.