आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाच ‘ब्रेथ अॅनालायझर’; त्याचाही नाही प्रभावी वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असतानाच, शहरातील वाहनांची संख्याही प्रचंड माेठ्या प्रमाणात वाढत अाहे. परिणामी, वाहतूक व्यवस्थेवरही माेठा ताण पडत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे. जवळपास सर्वच भागांत छाेटे-माेठे अपघात हे नित्याचेच झाले अाहेत. यात कित्येकजण मृत्युमुखी पडत अाहेत, तर असंख्य जायबंदी हाेत असल्याचे दिसून येते. मात्र, हे प्रकार राेखण्यासाठी तसेच अपघात संख्येवर नियंत्रण मिळवण्यात वाहतूक पाेलिस प्रशासनाला सातत्याने अपयशच येत अाहे. यात अाता ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ प्रकरणांचाही अाकडा वाढू लागल्याने पाेलिसांपुढे अाव्हान उभे ठाकले अाहे.
मद्यप्राशन करून बेदरकारपणे वाहने हाकणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यासाठी नाशिक वाहतूक पाेलिसांकडे सहा ब्रेथ अॅनालायझर मशिन्स अाहेत. मात्र, शहरातील वाढती वाहनसंख्या पाहता ही संख्या अगदी कमी असल्याचे जाणवते. विशेष म्हणजे, या मशिन्सचाही प्रभावी वापरच अनेकदा केला जात नसल्याने ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’चे प्रकार वाढू लागले अाहेत. पाेलिसांच्या दुर्लक्षामुळे अति मद्यप्राशन करून वाहन चालवित स्वत:सह इतरांचाही जीव धाेक्यात घालण्याचे धारिष्ट्य अनेकांकडून केले जात असल्याने रस्ता सुरक्षा धाेक्यात अाली अाहे.

या पार्श्वभूमीवर पाहणी केली असता, ब्रेथ अॅनालायझर घेतलेल्या संबंधित कंपनीकडून वाहतूक शाखेला प्रमाणपत्राची प्रतीक्षाच असल्याने सद्यस्थितीतील हे ब्रेथ अॅनालायझर प्रभावी तपासणीसाठी कितपत उपयोगाचे अाहेत, यात शंकाच अाहे. अाजघडीला तपासणीत वाहनचालकांनी किती मद्यप्राशन केले आहे, हे तपासण्यसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालावरच अवलंबून रहावे लागत असल्याची धक्कादायक बाबही पुढे अाली अाहे.

दिवस-रात्र माेहीम राबवण्याची गरज
शहरात कॉलेजरोड, गंगापूररोड, मखलमाबादराेड परिसर, सिडकाे, पाथर्डी फाटा, पंचवटी परिसरात रात्रीच्या वेळेस मद्यप्राशन करून भरधाव वाहने हाकण्याचे प्रमाण वाढले अाहे. हे प्रकार राेखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दिवसाच नव्हे, तर रात्रीही कडक तपासणी करण्याची गरज आहे. कायद्यान्वये एका लिटरमागे ३० एमएलपेक्षा अधिक अल्काेहाेलचे प्रमाण असल्यास कारवाई केली जाते. ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबवण्याची मागणी हाेत अाहे.

सिव्हिलमध्ये हाेते चालकांची तपासणी
वाहतूक पोलिसांच्या तपासणीत वाहनचालकाने मद्यप्राशन केले असल्याचे दिसून अाले, तर सद्यस्थितीत त्यांना ब्रेथ अॅनालायझर मशीनअभावी पुढील कारवाईसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात जावे लागत अाहे. या ठिकाणी संबंधित चालकाची वैद्यकीय तपासणी हाेऊन वैद्यकीय अहवाल मिळताे, त्यानुसार पुढील कारवाई केली जाते. यात बराच वेळ जात असल्याने वाहतूक पोलिसांच्या कामात अनेक अडथळे येत अाहेत. वाहतूक नियंत्रण विभागातील अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया अधिक प्रभावी सुलभ करायला हवी.

१४७ वाहनधारकांवर जूनपर्यंत कारवाई
वाहतूक पोलिसांकडून या वर्षी ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ प्रकरणात केवळ १४७ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांच्या विरोधात मोटार वाहन कायदा १८४, १८५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्षात ही माेहीम अधिक प्रभावीपणे राबवून अति मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज असल्याचे मत काही जागरूक नागरिकांनी ‘डी. बी. स्टार’कडे व्यक्त केले अाहे.

‘अाेके’ प्रमाणप्रत्राची अाजही प्रतीक्षाच
शहर वाहतूक पोलिसांकडील ब्रेथ अॅनालायझर मशिन्समध्ये काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाला हाेता. यानंतर दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीकडे या मशिन्स सुुपूर्द करण्यात आल्या होत्या. आता या मशिन्सची दुरुस्ती हाेऊन त्यांचा वापर पाेलिसांकडून केला जात अाहे. मात्र, प्रत्यक्षात या मशिन्स वापरायाेग्य असल्याचे ‘अाेके’ प्रमाणपत्र मिळण्याची प्रतीक्षा अाजही पाेलिस प्रशासनाला अाहे. परिणामी, मेडिकल पद्धतीवरच त्यांना अवलंबून राहावे लागत आहे.
थेट प्रश्न
शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, अपघात संख्याही दिवसेंदिवस वाढतच अाहे. यात ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’मुळे हाेणाऱ्या अपघातांचे प्रमाणही वाढू लागले अाहे. पोलिस अधिकाऱ्याने मद्यप्राशन करून भरधाव वाहन हाकताना केलेल्या अपघातामुळे ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत अाला अाहे. वाहतूक पोलिसांकडे अाजघडीला केवळ सहाच ब्रेथ अॅनालायझर मशिन्स असून, त्याचाही वापर प्रभावी हाेत नसल्याने तळीरामांकडून प्रमाणापेक्षा अधिक मद्यप्राशन करून बेदरकारपणे वाहने हाकली जात असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे.
थेट प्रश्न
देवीदास पाटील, पोलिसउपायुक्त
{ शहरात ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’चे प्रकार वाढू लागले आहे. ते राेखण्यासाठी काय ठाेस उपाययाेजना करणार?
-वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’चे प्रकार रोखण्यासाठी वाहनधारकांची नियमित तपासणी केली जाते.

{वाहतूक पोलिसांकडून प्रभावी तपासणी हाेत नसल्याच्या तक्रारी अाहेत. त्याबद्दल काय सांगाल?
-वाहतूक पोलिसांकडे ब्रेथ अॅनालायझर मशिन्स आहेत, त्याद्वारे तपासणी करताे. मात्र, सद्यस्थितीला मशीनचे प्रमाणपत्र येणे बाकी असल्याने मद्यप्राशनाबाबत सिव्हिलमध्ये जाऊन मेडिकल करण्याची पद्धत अवलंबली जात अाहे.

{‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’चे किती गुन्हे दाखल झाले आहेत?
-शहरात यावर्षी जून महिन्यापर्यंत १४७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली अाहे.