आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bribery Chikhalikar 60 Lakhs Works Now Under Observation

लाचखोर चिखलीकरच्या 60 कामांची चौकशी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सार्वजनिक बांधकाम खात्यातील लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकरच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या जवळपास 60 बांधकामांची गुणवत्ता व नियंत्रण विभागामार्फत चौकशी सुरू झाली आहे. निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांना सवलत दिल्याच्या संशयावरून तपासणी केली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

एप्रिलमध्ये बांधकाम खात्यातील कार्यकारी अभियंता चिखलीकरसह एका उपअभियंत्याला लाच घेताना प्रत्यक्ष अटक झाली होती. चिखलीकरच्या अटकेनंतर पोलिसांना त्याच्या निवासस्थानी व बँक लॉकरवर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची माया सापडली होती. कोट्यवधीचे घबाड कमवण्यासाठी चिखलीकरने काय केले, याची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे छाप्यानंतर चिखलीकरच्या कार्यपद्धतीविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या.

सूत्रांच्या माहितीप्रमाणे, आवश्यक नसताना कामांची अंदाजपत्रके फुगवणे, निकृष्ट कामांबाबत येणार्‍या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासारखे प्रकारही घडल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कानावर आले होते. त्यामुळे चिखलीकरकडील चार तालुक्यांतील कामांची प्राथमिक तपासणी सुरू झाली आहे. दक्षता नियंत्रण विभागाला एक महिन्यात त्याबाबत अहवाल देण्याचे बंधन असल्याचे समजते. प्रत्येक तालुक्यातील 15 याप्रमाणे, सुरगाणा, पेठ, त्र्यंबक व दिंडोरीकडील काही भागातील बांधकामांची तपासणी केली जाणार आहे.

गोपनीय अहवाल देणार
चिखलीकरच्या कार्यकाळात मंजूर कामांची तपासणी साधारण 15 दिवसांपूर्वी सुरू केली आहे. त्याबाबतचा अहवाल मात्र गोपनीय असून, मुख्य अभियंत्यांना सादर केला जाणार आहे. विलास वानखेडे, अधीक्षक अभियंता, गुणवत्ता व नियंत्रण विभाग, बांधकाम खाते