आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरीचे दागिने चोरणारा ‘बंटी’ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  लग्नमंडपात वधू कक्षात घुसून नववधूचे आणि तिच्या बहिणीचे दागिने लांबवणाऱ्या ‘बंटी’ला म्हसरूळ पोलिसांनी पाच तासांत बेड्या ठोकल्या. बुधवारी (दि. १) दुपारी १२ वाजता मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील एका लॉन्समध्ये या धाडसी चाेरीचा प्रकार घडला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. ४) गुन्हा दाखल झाल्यानंतर लॉन्समधील सीसीटीव्हीच्या अाधारे पोलिसांनी संशयितास अवघ्या पाच तासांत बुधवार पेठ येथे जेरबंद केले सुमारे पावणेदोन लाखांचे दागिने त्याच्याकडून हस्तगत केले. 
 
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील औदुंबर लॉन्स येथे वधू कक्षात एका संशयिताने वऱ्हाडी म्हणून प्रवेश करत नववधू आणि तिच्या बहिणीचे दागिने शिताफीने चोरी केले. हा सर्व प्रकार कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. लग्न घटिका जवळ येत असताना वधूचे दागिने मिळत नसल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर दोन्ही पक्षांतील आयोजकांनी एकत्र येत लग्नविधी ठरलेल्या वेळेत पार पाडला. लग्नकार्यात व्यस्त असताना शनिवारी (दि. ४) पोलिसांत तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले. एक संशयित डोक्याला फेटा बांधून लॉन्समध्ये फिरताना निदर्शनास येत होता. तक्रारदार या संशयितास ओळखत नव्हते. कक्षामधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासणी करण्यात आल्यानंतर हा संशयित हातात बॅग घेऊन जाताना निदर्शनास आला. गुन्हे शोधपथकातील कर्मचाऱ्यांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवत संशयिताची ओळख पटवली. राजेंद्र नामदेव जाधव (रा. बुधवार पेठ) असे नाव निष्पन्न झाले. सायंकाळी वाजता घराच्या जवळ सापळा रचण्यात आला. यामध्ये संशयित अलगद पथकाच्या जाळ्यात अडकला. घरझडतीमध्ये चोरी केलेले दागिने अाढळून आले. उपनिरीक्षक गणेश गिरी, प्रशांत वालझाडे, विजय विधाते, बीट मार्शल राजेश लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
म्हसरूळ पाेलिसांनी दागिने चाेरीप्रकरणी संशयितास जेरबंद केले. 
बातम्या आणखी आहेत...