आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीआरटीएस विरोधी मार्गावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरांतर्गत चांगल्या परिवहन व्यवस्थेसाठी बीआरटीएससारखा प्रकल्प आवश्यक असल्याचे मत सत्ताधारी मनसे व भाजपबरोबरच राष्ट्रवादीनेही व्यक्त केले असून, शिवसेना व काँग्रेसने ‘बससेवा तोट्यात चालवण्यात अर्थ काय’, असा सवाल करीत सिंहस्थाच्या निधीतून रिंगरोड होत असताना पुन्हा कर्जबाजारी होऊन बीआरटीएससाठी रस्ते उपलब्ध करून देऊ नये, अशी विरोधी भूमिका घेतली आहे.

शहर बससेवेमुळे परिवहन महामंडळास वर्षाला जवळपास 18 कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागत आहे. दुसरीकडे, महापालिकेने बससेवा चालवण्यासाठी घेण्याचा प्रस्तावही मध्यंतरी चर्चेत आला. मात्र, त्यावर टीका झाल्यानंतर तत्कालीन सत्ताधारी शिवसेना-भाजपने प्रस्ताव मागे घेतला. आता जागतिक पातळीवर यशस्वी ठरलेला बीआरटीएस प्रकल्प नाशिकमध्ये आणण्यावरून खल सुरू झाला आहे. मात्र, त्याबाबत राजकीय पक्षांमध्ये कमालीचे मतभेद असून ‘प्रकल्पासाठी पैसे कोठून आणायचे’, ‘तोट्यातील सेवा पालिकेला आणखी आर्थिक संकटाच्या खाईत ढकलणार नाही का’, अशी प्रश्नवजा मते व्यक्त होत आहेत.

फुकटचा खर्च नको अन्यथा बससेवा आत्मघाती
महामंडळाची शहर बससेवा तोट्यात असताना महापालिकेच्या माध्यमातून बससेवा चालवणे आत्मघाती ठरेल. सध्या महामंडळ दोनशे बसच्या माध्यमातून सेवा देत असताना नऊशे बस खरेदीचा प्रस्ताव अनाकलनीय आहे. बीआरटीएसमधून रस्ते होतील असे दाखवण्याचा प्रयत्न चुकीचा असून सिंहस्थ व डिफर्ड पेमेंटमधून आधीच रिंगरोड व रस्त्यांसाठी तरतूद झालेली आहे. सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेता, शिवसेना

बीआरटीएसच्या पर्यायांचा अभ्यास सुरू
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी मास पब्लिक ट्रान्सपोर्टशनचे जाळे मजबूत करण्यासाठी खासगी संस्थेकडून पर्याय मागवले होते. त्याप्रमाणे रस्ते, अत्यानुधिक दर्जाची व वातानुकूलित बसस्थानके करून प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे आकर्षित करण्यासाठी काही पर्यायांचा अभ्यास सुरू आहे. शहराच्यादृष्टीने ज्या पर्यायांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करेल. यतिन वाघ, महापौर, नाशिक मनपा.

बस चालवणे हे पालिकेचे कामच नाही
महापालिकेचे काम रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधा देण्याचे आहे. बस चालवणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामच नाही. आधीच महामंडळाची बससेवा तोट्यात असताना अशात बीआरटीएससारखे प्रकल्प चालवण्यासाठी घेणे चुकीचे ठरेल. बीआरटीएसची संकल्पना नेमकी समजून घेतली पाहिजे. लक्ष्मण जायभावे, गटनेता, काँग्रेस