आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप : ‘बीएसएनएल’च्या ग्राहकांची गैरसोय ग्राहक केंद्राची चार लाख रुपयांची उलाढाल ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या १९ संघटनांनी एकत्र येऊन खासगीकरणाच्या विरोधात पुकारलेल्या दोनदिवसीय संपाला मंगळवारी प्रारंभ झाला. दूरसंचारच्या मायको सर्कल येथील प्रशासकीय कार्यालयासह कॅनडा कॉर्नर येथील ग्राहकसेवा केंद्र बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.
जिल्ह्यातील १५०० अधिकारी कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने प्रशासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. वर्क्स विभाग, नियोजन विभाग, मार्केटिंग विभाग, जनरल विभागासह अन्य विभाग बंद असल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प होऊन चार लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

भारत संचार निगम ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असूनही प्रगतीच्या दिशेने केंद्र सरकारने नकारात्मक धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे एअरटेल, आयडिया यासारख्या खासगी मोबाइल कंपन्यांकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. ‘बीएसएनएल’च्या उपकंपन्यांमधील विभाजन थांबवणे, ग्रामीण भागातील बीएसएनएलच्या सेवांचा तोटा भरून काढणे, सेवा सुधारण्यासाठी विकास करण्यासाठी नवीन यंत्रसामग्री खरेदी करणे, बीएसएनएलची स्थावर मालमत्ता बीएसएनएलच्या नावे करून घेणे, एमटीएनएलचे बीएसएनएलमध्ये विलीनीकरण थांबवणे, फोर जी सेवा सुरू करणे, आयटीआय कंपनीकडून यंत्रसामग्री विकत घेण्याची सक्ती काढून टाकणे, नवीन अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती करणे, ट्रायने निर्देशित केलेले १०२ गिगाहर्ट‌्झ स्पेक्ट्रम नाकारून प्रिमियम ९०० मेगाहर्ट‌्झ बँड मिळावा, डिलाइटी कन्सल्टंट यांनी सुचवलेल्या बीएसएनएल कर्मचारी कपाती प्रस्तावास विरोध आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

ग्राहक केंद्रात शुकशुकाट

कॅनडा कॉर्नर येथील बीएसएनएलचे ग्राहक सेवा केंद्र संपामुळे बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. येथे दूरध्वनी, मोबाइल बिल स्वीकृती, प्रीपेड रिचार्ज देणे, नवीन कनेक्शन देणे आदी कामे चालतात. परंतु, संपामुळे हे केंद्र बंद असल्याने संपाच्या पहिल्या दिवशी या केंद्रातून होणारी चार लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

‘बीएसएनएल बचाव’साठी संप

बीएसएनलचे ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळाले असून, केंद्राचे बीएसएनलबाबत नकारात्मक धोरण असून बीएसएनएल बचावसाठी हा दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे.-लक्ष्मण शिंदे,परिमंडलअध्यक्ष, भारतीय टेलिकॉम एम्पलॉइज युनियन