आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या अंदाजपत्रकात 475 कोटींची तूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीवर सादर केलेले अंदाजपत्रक दोन कोटी 83 लाख रुपयांचे शिलकी असल्याचा दावा खोटा असून, विकासकामांच्या ‘अ’ व ‘ई’ यादीतील जवळपास 465 कोटी रुपयांचे आकडे दडवून ठेवल्यामुळे अंदाजपत्रकात 475 कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर चुकीचे अंदाजपत्रक सादर करणार्‍या तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा तसेच नवीन अंदाजपत्रक तयार करा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी केली आहे.सहाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आयुक्तांनी 1872 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले असून, यात चालू कामांसाठी ‘अ’ यादीत 485 कोटी रुपयांची तरतूद दाखवली आहे.
प्रत्यक्षात महासभा व प्रभाग सभेने मंजुरी दिलेल्या कामांचा हिशेबच दिलेला नाही. यादीतील कामांची बेरीज केल्यावर हा आकडा 664 कोटींवर जात असून, अंदाजपत्रकातून 178 कोटी दडवले आहेत. पुन्हा निविदा मंजुरीच्या कारवाईत असलेल्या कामांच्या ‘क’ यादीत 98 कोटींची तरतूद असून, प्रत्यक्षात यादीतील कामांची बेरीज केली तर 137 कोटींपर्यंत आकडा जात आहे. तुटीची रक्कम 39 कोटी इतकी आहे. यादीत 702 कोटींचा स्पिल ओव्हर दाखवला असून, त्यात ‘ई’ यादीतील कामांचा समावेश दाखवला आहे. प्रत्यक्षात ‘ई’ यादीतील कामांची बेरीज केली तर 250 कोटी रुपयांची तफावत दिसत आहे. दडवून ठेवलेल्या आकड्यांचा विचार केला तर, स्पिल ओव्हर 110 कोटींवर जात असून, अंदाजपत्रकात 465 कोटी रुपयांची तूट येत आहे. अशा परिस्थितीत खोट्या आकडेवारीवर आधारित अंदाजपत्रकावर चर्चा करणेच अव्यवहार्य असून, तातडीने ते रद्द करून पुनर्नियोजन करणे गरजेचे आहे.
अंदाजपत्रकीय सभा ठरणार वादळी
अंदाजपत्रकातील आकडेवारीवरून शिवसेना आक्रमक झाली असून, आज होणारी अंदाजपत्रकीय सभा रद्द करण्याची मागणी केली जाणार असल्याचे सहाणे यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते तसेच गटनेत्यांशी चर्चा करून सभागृहातील सर्व सदस्यांना वस्तुस्थिती पटवून दिली जाणार आहे. तसेच नवीन अंदाजपत्रक तयार करून त्याची अंमलबजावणी करा, अशीही मागणी केली जाणार आहे.